मिसाळवाडीकरांच्या आंदोलनाला यश; ‘त्या’ शिक्षकाची नियुक्ती अखेर रद्द!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-शाळेला ठोकले होते कुलूप; जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियुक्ती रद्द, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी चांगला शिक्षक देण्याची मागणी

चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षक अनिल दांडगे यांच्या करण्यात आलेल्या नियुक्तीविरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. संतप्त ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकून प्रशासनाविरोधात आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने संबंधित शिक्षकाची नियुक्ती रद्द केली आहे. या निर्णयामुळे मिसाळवाडीकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक अनिल दांडगे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मिळताच गावात असंतोष पसरला होता. दांडगे यांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांची नियुक्ती या शाळेवर करू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. यासंदर्भात ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडून राजकीय दबावाचे कारण पुढे करण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. तसेच स्थानिक मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांवर दबाव आणून दांडगे यांना रुजू करून घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला.

शाळेला कुलूप ठोकून आंदोलन

प्रशासनाच्या भूमिकेमुळे पालक व ग्रामस्थांचा संयम सुटला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेतील वातावरण सुरळीत राहावे, यासाठी संतप्त ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येत शाळेला कुलूप ठोकले. दांडगे यांची नियुक्ती रद्द न केल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा आणि संभाव्य आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा परिषद प्रशासनाने अखेर संबंधित नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला. अनिल दांडगे यांची मिसाळवाडी जिल्हा परिषद शाळेवरील नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.

चांगला व समर्पित शिक्षक देण्याची मागणी

नियुक्ती रद्द झाल्याने ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश आले असले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता तातडीने गुणवंत, चांगला व समर्पित शिक्षक शाळेला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

“विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवूनच गावकऱ्यांनी ही लढाई लढली. वादग्रस्त शिक्षकाची नियुक्ती रद्द करून प्रशासनाने उशिरा का होईना, शहाणपण दाखवले आहे. आता वेळ न दवडता जिल्हा परिषद प्रशासनाने आमच्या शाळेला तातडीने चांगला व समर्पित शिक्षक उपलब्ध करून द्यावा.”

हनुमान मिसाळ, उपसरपंच, मिसाळवाडी


मिसाळवाडी हे चिखली तालुक्यातील अत्यंत प्रभावशाली गाव असून, ग्रामस्थांचा विरोध असेल तर तेथे वादग्रस्त व व्यसनी शिक्षक देऊ नका, असा स्पष्ट निरोप मिसाळवाडीचे भूमिपुत्र असलेल्या प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शिक्षणाधिकारी यांना दिला होता.

 

Share This Article
Exit mobile version