समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील रमावि हॉटेलला शॉर्टसर्किटमुळे आग; MSF व QRV पथकांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-दुसरबीड-मेहकर पथकांची घटनास्थळी धाव; आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक ३१०.६ येथे असलेल्या रमावि हॉटेलमध्ये शनिवारी दुपारी सुमारे १२.३० वाजेदरम्यान शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. हॉटेलमधून धूर व आगीच्या ज्वाळा दिसून येताच परिसरात काही काळ धावपळ उडाली. मात्र, महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) तसेच QRV पथकांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.

आगीची माहिती मिळताच IC-12 दुसरबीड येथील महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षा पर्यवेक्षक गोपाल डहाळके यांनी तातडीने संबंधित यंत्रणांना माहिती देत घटनास्थळी मदतकार्य सुरू केले. त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक उमेश नागरे आणि सुरक्षा रक्षक सचिन डोंगरे यांनीही आग नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाहीत सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, आगीची तीव्रता लक्षात घेऊन QRV पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. QRV पथकातील ओमकार नागरे, अभिषेक कांदे आणि गोपाल काळे यांनी घटनास्थळी धाव घेत MSF जवानांसोबत समन्वय साधत आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. MSF जवान आणि QRV पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आवश्यक खबरदारी घेतली. आग इतर भागात पसरणार नाही, यासाठी प्रयत्न करण्यात आले. संयुक्त प्रयत्नांमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

मुंबई कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या मार्गावर हॉटेलमध्ये आग लागल्याने वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आपत्कालीन पथकांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीमुळे हॉटेलचे नेमके किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून आवश्यक तपासणी व पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

MSF व QRV पथकाची तत्परता ठरली महत्त्वाची

आपत्कालीन परिस्थितीत MSFचे सुरक्षा पर्यवेक्षक गोपाल डहाळके, सुरक्षा रक्षक उमेश नागरे, सुरक्षा रक्षक सचिन डोंगरे तसेच QRVचे ओमकार नागरे, अभिषेक कांदे आणि गोपाल काळे यांनी दाखविलेली तत्परता व समन्वय यामुळे आग वेळीच नियंत्रणात आणता आली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे दिसून आले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व व्यावसायिक आस्थापनांमध्ये विद्युत वायरिंग, विद्युत उपकरणे तसेच अग्निसुरक्षा साधनांची नियमित तपासणी आणि देखभाल करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Share This Article
Exit mobile version