वादग्रस्त शिक्षकाच्या नियुक्तीविरोधात मिसाळवाडीत ग्रामस्थ आक्रमक; जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

मंगळवारपर्यंत निर्णय न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलनाचा इशारा

चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर वादग्रस्त ठरलेल्या सहशिक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याने ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती कमालीचे आक्रमक झाले आहेत. राजकीय दबावातून झालेली ही नियुक्ती रद्द करावी, या मागणीसाठी पालकांनी व गावकऱ्यांनी शनिवारी शाळेला थेट कुलूप ठोकले. येत्या सोमवारी या नियुक्तीबाबत प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मिसाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर सहशिक्षक अनिल सुरेश दांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्तीला शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन आणि समस्त गावकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पूर्वकल्पना देऊन ही नियुक्ती रद्द करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने गावकऱ्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत संबंधित शिक्षकाला रुजू करून घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ही बाब समोर येताच संतप्त पालकांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शाळेला टाळे ठोकले.

इतर शाळांमधूनही झाला होता विरोध

संबंधित शिक्षकाचा पूर्वेतिहास पाहता, यापूर्वी शेळगाव आटोळ आणि अमोना येथील शाळांमधूनही त्यांच्या उपस्थितीला स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड विरोध दर्शवला होता. जि. प. शाळांची घटती पटसंख्या चिंतेचा विषय असताना, अशा वादग्रस्त शिक्षकामुळे मिसाळवाडी शाळेचीही पटसंख्या घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“संबंधित वादग्रस्त शिक्षकाला इतर ठिकाणच्या ग्रामस्थांनीही नाकारले आहे. आधीच जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या टिकवणे आव्हानात्मक झाले आहे. अशा स्थितीत या शिक्षकाची नियुक्ती झाल्यास आमच्या शाळेची पटसंख्या घटेल. त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही नियुक्ती रद्द करावी आणि शाळेला तत्काळ अभ्यासू व चांगला शिक्षक द्यावा.”

— हनुमान मिसाळ (उपसरपंच, मिसाळवाडी तथा युवा नेते, क्रांतीकारी शेतकरी संघटना)

मंगळवारी जिल्हा परिषदेवर धडकणार

निवेदन देऊनही प्रशासनाने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सोमवारी या नियुक्तीबाबत प्रशासनाकडून योग्य तो सकारात्मक निर्णय न झाल्यास, मंगळवारी मिसाळवाडी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करणार असल्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच हनुमान मिसाळ, सुनील मिसाळ यांच्यासह ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version