भविष्यात नदीच्या पाण्यामुळे उत्रदा येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी उपाययोजना करा!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांचे ठिय्या आंदोलन; नायब तहसीलदार गायकवाड यांच्या मध्यस्थीने तोडगा, उद्यापासून छोट्या पुलाच्या कामास सुरुवात

चिखली (तालुका प्रतिनिधी) : उत्रदा गावाजवळ पैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अजयदीप इन्फ्राकॉन प्रा. लि. कंपनीमार्फत रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याच्या ठिकाणी छोटा पूल बांधण्यात येत नसल्याने भविष्यात नदीचे पाणी शेतांमध्ये तुंबून शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून, ‘आधी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करा, नंतरच रस्त्याचे काम करा’, अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर दरवर्षी उत्रदा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होते. त्यातच आता रस्त्याची उंची वाढविण्यात येत असल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडल्यास शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे संबंधित ठिकाणी तातडीने छोटा पूल बांधून पाण्याच्या विसर्गाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

वारंवार मागणी करूनही याबाबत दखल घेतली जात नसल्याने आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न करताच रस्त्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याबाबतची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांना देण्यात आली. माहिती मिळताच विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. घटनास्थळावरूनच संबंधित विभागाचे अधिकारी तसेच तहसीलदार सवडे व नायब तहसीलदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली. यावेळी ‘आज रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर छोट्या पुलाचे बांधकाम कोण करणार? भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण?’ असा थेट सवाल विनायक सरनाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केला. तसेच भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी रस्त्याचे काम पूर्ण करण्यापूर्वीच पाण्याच्या विसर्गाची योग्य व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली.

अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

शेतकरी तसेच विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर नायब तहसीलदार गायकवाड व संबंधित विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर भविष्यात पाण्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणी तीन लाईन बंब टाकून छोटा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावित कामाचे मोजमाप तहसीलदार, संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत चुना टाकून करण्यात आले.

नायब तहसीलदार गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी

नायब तहसीलदार गायकवाड यांच्या मध्यस्थीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून, उद्यापासून छोट्या पुलाच्या कामास सुरुवात होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या निर्णयामुळे उत्रदा परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. छोट्या पुलामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पाण्याचा योग्य विसर्ग होण्यास मदत होऊन शेतांमध्ये पाणी तुंबण्याची समस्या कमी होणार असून, भविष्यात शेतीपिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, तहसीलदार सवडे यांनी संबंधित विभागाचे स्थानिक अधिकारी तसेच श्री. खरात यांना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी ईश्वरराव इंगळे, नवलसिंग इंगळे, प्रल्हाद इंगळे, संतोष इंगळे, निवृत्ती इंगळे, दिपराव इंगळे, सदराम इंगळे, नारायण इंगळे, एकनाथ इंगळे, रमेश कमळीक, सीताराम इंगळे, विजय इंगळे, भगवान इंगळे, सुभाष इंगळे, अशोक शामराव इंगळे, प्रकाश भजनसिंग, तेजराव इंगळे, शिवाजी इंगळे, नवलसिंग किसनराव इंगळे, सदाशिव शंकरराव इंगळे, ईशानदेव सखाराम इंगळे, गजानन चांगदेव इंगळे, ईश्वर भीमराव इंगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version