– कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न २०२१ पासून मेहकर तहसीलदारांकडे पडून!
– कचरा डेपोचा प्रश्न सुटला नाही तर वेगाने वाढणार्या गावातील कचरा कुठे टाकावा, हा प्रश्न अतिगंभीर होणार – मनोहर गिर्हे
बुलढाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र टीम) – ”निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींचे नाव आम्ही खराब होऊ देणार नाही. गावातील घाणकचरा विल्हेवाटीचा हा प्रश्न कचराडेपोअभावी गंभीर झालेला आहे. जे लोकं उघड्यावर कचरा टाकत आहेत, तेच डंपिंग स्टेशनला विरोध करत आहेत. तरीही आम्ही गावात कचरा साचू देत नाहीत. तसेच, नाल्यांना काही लोकं विरोध करत होते. त्यांचा विरोध मोडित काढून आजच आम्ही नालीप्रश्न सोडवला. काहीजण हेतुपुरस्सर आडवे येतात, त्यामुळे गावात किरकोळ समस्या निर्माण होतात. आम्ही सांमजस्याने व चर्चेतून एक एक प्रश्न सोडवत आहोत”, अशी माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना हिवरा आश्रम गावाचे नेते तथा सरपंचपती मनोहर गिर्हे यांनी दिली. आज तातडीने त्यांनी तुंबलेली नाली साफ करत, तसेच कचरा विल्हेवाट लावत, गेले काही दिवस वादग्रस्त बनलेला मुद्दा निकाली काढला.
विशेष बाब म्हणजे, डंपिंग स्टेशनसाठी गट नंबर ६९मधील ई-क्लास जागा मिळावी, यासाठी मेहकरचे तहसीलदार यांना १८ ऑगस्ट २०२१ रोजीच पत्र दिलेले आहे. तहसीलदारांनी अद्यापही ग्रामपंचायतीला ही जागा दिली नाही. ई-क्लास असलेली ही जागा ग्रामपंचायतीला मिळाली तर तेथे गावातील कचरा संकलन करता येईल, व त्याद्वारे या कचर्यापासून कंपोस्ट खतदेखील तयार करता येईल. परंतु, मेहकरचे तहसीलदार याबाबत काहीही कार्यवाही करत नसल्याने गावातील घाणकचर्याची समस्या उग्र झालेली आहे. इतकी गंभीर समस्या असतानाही आम्ही गावात कचरा साचू देत नाही. ज्या साचलेल्या कचर्याबाबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, त्या जागेचा प्रश्न कोर्टात पेंडिंग आहे. गावात कचरा संकलनासाठी घंटागाडीही ग्रामपंचायतीने घेतलेली आहे. त्याद्वारे नियमित कचरा संकलन होते. परंतु, काही ग्रामस्थ उघड्यावर कचरा टाकून, गावाला विद्रूप बनविण्याचे काम करत आहेत, असेही मनोहर गिर्हे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
आम्ही पू. शुकदास महाराजश्रींचे नाव खराब होऊ देणार नाही!
– निर्मला मनोहर गिर्हे, सरपंच, हिवरा आश्रम
————–

