पांगरी उगले येथे विपश्यना शिबिर संपन्न; शेकडो युवक व विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ग्रामीण भागातील साधकांसाठी विशेष आयोजन; ९० साधकांसह राहेरी बु. येथील ६० विद्यार्थ्यांचा बालसंस्कार शिबिरात सहभाग

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : तालुक्यातील पांगरी (उगले) येथे ग्रामीण परिसरातील साधकांसाठी विशेष विपश्यना शिबिर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरात विविध भागांतून आलेल्या साधकांसह विद्यार्थी सहभागी झाले.

शिबिराचे आयोजक व प्रमुख मार्गदर्शक डॉ. श्रीराम राठोड यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच सामान्य नागरिकांसाठी या विपश्यना शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचा एकूण ९० साधकांनी लाभ घेतला. यामध्ये नव्या साधकांसाठी १० दिवसांच्या विपश्यना शिबिरात २० साधकांनी सहभाग घेतला, तर त्यानंतर झालेल्या तीन दिवसीय जुन्या साधकांच्या शिबिरात १० साधकांनी हजेरी लावली. अशा एकूण ३० साधकांनी या विपश्यना शिबिराचा लाभ घेतला.

बालसंस्कार शिबिरात ६० विद्यार्थ्यांचा सहभाग

१५ सप्टेंबर रोजी लहान बालकांसाठी विशेष बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मौजे राहेरी बु. येथील प्राथमिक शाळेतील ६० विद्यार्थी सहभागी झाले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेडचे माजी अधिष्ठाता आणि पांगरी (उगले) हे जन्मगाव असलेले डॉ. श्रीराम राठोड यांनी हे शिबिर आयोजित केले होते. प्रमुख मार्गदर्शक तथा प्रशिक्षक आचार्य बाबुराव कस्तुरे, संभाजीनगर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले. पांगरी (उगले) येथील विपश्यना समितीचे अध्यक्ष राजेंद्र खरात, सचिव प्रमोद राठोड आणि प्रमुख डॉ. श्रीराम राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

मानसिक व सामाजिक स्वास्थ्यासाठी विपश्यनेचा संदेश

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानवी समाजजीवनातील मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य हरवत चालले असून, जीवनातील निखळ आनंदही कमी होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येकजण तणावाखाली जगत असल्याचे आढळून येते. सुख मिळवण्यासाठी धावताना दुःखच वाट्याला येत असल्याने अनेक जण व्यसनांकडे वळताना दिसून येतात. अशा परिस्थितीत मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी, मनःशांती, मनःशुद्धी, व्यसनमुक्ती, तणावमुक्ती तसेच आध्यात्मिक व सांस्कृतिक विकासासाठी विपश्यना शिबिराच्या माध्यमातून सर्वांगीण लाभ होतो, असा दावा आयोजकांनी केला आहे.

 

Share This Article
Exit mobile version