आयुर्वेदातील आजीचा बटवा लोप पावला; नर्मदाबाई इंगळे यांचे निधन

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-झाडपाला आणि आयुर्वेदिक उपचारांचे ज्ञान जपणाऱ्या नबामाय इंगळे काळाच्या पडद्याआड; साखरखेर्डा परिसरात हळहळ

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : ‘जुने ते सोने’ या म्हणीप्रमाणे आपल्या देशातील जुन्या रूढी-परंपरा आणि संस्कार आजही ज्येष्ठ मंडळी जपत आहेत. झाडपाला आणि आयुर्वेदिक औषधांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी मोठ्या अनुभवातून या उपचारपद्धती विकसित केल्या. अनेक अंगांनी विचार करून त्यांचा अवलंब केल्याने या पद्धती लोकाभिमुख झाल्या. त्यामुळे आजही या पारंपरिक ज्ञानाचा विचार करण्याची गरज भासते. म्हणूनच ‘जुने ते सोने’ असे म्हणावे लागते.

साखरखेर्डा येथील अशाच एक आजीमाय म्हणून परिचित असलेल्या नबामाय, अर्थात नर्मदाबाई उकर्डा इंगळे यांचे १६ सप्टेंबर रोजी साखरखेर्डा येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

झाडपाला आणि पारंपरिक उपचारांचे ज्ञान

नबामाय यांनी आयुष्याचा गाडा हाकताना हलाखीच्या परिस्थितीत अनेक अडचणींचा सामना केला. जुन्या काळात होणाऱ्या विविध आजारांवरील उपचारांचा त्यांनी अनुभव घेतला आणि झाडे, पाने, पालापाचोळा यांपैकी कोणता घटक कोणत्या आजारावर गुणकारी ठरतो, याचे ज्ञान त्यांनी आत्मसात केले. शेतात कामाला जात असतानाही त्या झाडपाल्याची ओळख करून घेत असत. स्वभावाने कुणाच्याही कामी यावे, अशी वृत्ती असल्याने आजारी व्यक्ती किंवा लहान मुले उपचारासाठी त्यांच्याकडे आली की त्या आनंदाने त्यांच्यावर उपचार करायच्या. खांडूक, बोटाला होणारे इन्फेक्शन, सडवा तसेच पायाला झालेले कुरूप यांसारख्या त्रासांवर त्यांच्याकडे पारंपरिक उपचार असायचे. त्यांच्या हाताला उपचाराचा गुण असल्याचे परिसरातील नागरिक सांगायचे. डोळ्यात कचरा गेल्यास डोळ्याला इजा न करता तो कचरा काढण्याची पारंपरिक पद्धत त्यांना अवगत होती. अर्धशिशी किंवा अर्ध डोकेदुखीचा त्रास झाल्यासही नागरिक त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत. पिंपळाच्या पानाचा देठ नाकपुडीत टोचून नाकातून खराब रक्त बाहेर काढण्याची पारंपरिक पद्धत त्या वापरत असत, असे सांगितले जाते. पोटाला लागलेला जखडा योग्य पद्धतीने कापडाचा पिळा मारून मोकळा करण्याची पद्धतही त्यांना अवगत होती. लहान मुलांना होणाऱ्या त्रासावरून त्याचे निदान करून त्या औषधोपचार करायच्या. तसेच दोरी-गंडा देण्याची पारंपरिक पद्धतही त्या करत असत.

निःस्वार्थ सेवेमुळे परिसरात ओळख

हे सर्व करत असताना नबामाय यांनी कधीही कोणाकडून कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवली नाही. निःस्वार्थ वृत्तीने त्या नागरिकांच्या मदतीला धावून जात असत. त्यामुळे साखरखेर्डा परिसरातील अनेकांच्या तोंडी नबामाय यांचे नाव होते. नबामाय यांच्यासारख्या वयोवृद्ध व्यक्तींच्या निधनाने पारंपरिक ज्ञानाची एक पिढी हळूहळू लोप पावत असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे साखरखेर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version