लोणार नगरपरिषदेस कायमस्वरूपी व पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करा!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-नागसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी यांची उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

लोणार (वाजिद खान) : लोणार नगरपरिषदेस नियमित व पूर्णवेळ मुख्याधिकारी उपलब्ध नसून, सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजासह शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या नियोजन, अंमलबजावणी व संनियंत्रणावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देत नागसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्र्यांकडे लोणार नगरपरिषदेस तातडीने नियमित व पूर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

Scanned Document 7

लोणार शहराला ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक व पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथील लोणार सरोवर तसेच परिसरातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमुळे लोणार हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. शहराचा पर्यटनदृष्ट्या नियोजित विकास करण्यासाठी नागरी पायाभूत सुविधा तसेच पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे. सध्या लोणार नगरपरिषद क्षेत्रात विविध विकासकामे सुरू असून, त्यांची विहित कालमर्यादेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्रशासकीय नेतृत्वाची आवश्यकता आहे. विकासकामांचे नियोजन, प्रशासकीय व तांत्रिक समन्वय, निधीचा नियमानुसार विनियोग, कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा तसेच संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधण्यासाठी मुख्याधिकारी पदावर पूर्णवेळ अधिकारी कार्यरत असणे आवश्यक आहे. मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे असल्यामुळे त्यांच्या मूळ प्रशासकीय जबाबदाऱ्यांसोबत अतिरिक्त जबाबदारी येत आहे. परिणामी, लोणार नगरपरिषदेच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजासह शहरातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचे सातत्यपूर्ण नियोजन, पर्यवेक्षण व संनियंत्रण करण्यामध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विकासकामांच्या प्रगतीवर तसेच विहित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. लोणार शहराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुविधा, पर्यटक सुविधांचे बळकटीकरण, शहर सुशोभीकरण तसेच पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विकासकामांना गती देणे आवश्यक आहे. यासाठी नगरपरिषदेस सक्षम व पूर्णवेळ प्रशासकीय नेतृत्व मिळणे गरजेचे आहे.

लोणार नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी, सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांना गती देण्यासाठी आणि लोणार शहराचा पर्यटनदृष्ट्या नियोजित व शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी लोणार नगरपरिषदेस तातडीने नियमित, पूर्णवेळ व स्वतंत्र मुख्याधिकारी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी नागसेवक तथा बांधकाम सभापती अनिकेत राजेश मापारी यांनी केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, विभागीय आयुक्त, अमरावती विभाग तसेच जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.

संपर्क :

अनिकेत राजेश मापारी
नागसेवक तथा बांधकाम सभापती
लोणार नगरपरिषद, लोणार, जि. बुलढाणा.

Share This Article
Exit mobile version