-शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान व पीकविमा देण्याची मागणी; तलावांवरील अवैध उपसा बंद करून पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याचे आवाहन
मेहकर (वाजिद खान) : बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मेहकर येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार १६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता हे निवेदन देण्यात आले.
मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मेहकर तालुक्यात ऑगस्ट आणि चालू सप्टेंबर महिन्यात अत्यंत अल्प पाऊस झाला आहे. विशेषतः सोयाबीन पिकाच्या शेंगा भरण्याच्या आणि पक्व होण्याच्या महत्त्वाच्या कालावधीत पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. शासनाने दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर केली असली, तरी त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून बुलढाणा जिल्हा दुष्काळसदृश जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारच्या धर्तीवर हेक्टरी अनुदान जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली. मागील वर्षी मेहकर तालुक्याची आणेवारी ५० पैशांच्या आत असतानाही २०२५-२६ या वर्षाचा पीकविमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे मागील वर्षाचा पीकविमा शेतकऱ्यांना मिळावा, या प्रमुख मागणीचाही निवेदनात समावेश करण्यात आला.
तलावांवरील अवैध उपसा बंद करण्याची मागणी
दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने मेहकर तालुक्यातील लघु तलाव, गाव तलाव आणि पाझर तलावांवरील अवैध तसेच सर्व प्रकारचा पाणीउपसा बंद करण्यात यावा. तलावांमधील पाणी राखीव ठेवून पाणवठे सुरक्षित करावेत, तसेच तलावांनजीकच्या विद्युत रोहित्रांवरील अवैध विद्युत जोडण्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. पाण्याचा अवैध उपसा थांबविल्यास येणाऱ्या काळात तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
यावेळी लोणार तालुका व मेहकर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. घोषणाबाजी करत माजी आमदार संजय रायमुलकर यांच्याकडे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणदादा घुमरे, अनंतराव वानखेडे, देवानंद पवार, वसंतराव देशमुख, लोणार नगरपालिकेचे नगराध्यक्ष भूषण मापारी, साहेबराव पाटोळे, तालुका अध्यक्ष प्रदीप देशमुख, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, मेहकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज हजारी, शैलेश बाविस्कर, लोणार नगरपालिकेचे उपाध्यक्ष आबेद खान, नगरपालिकेचे उपाध्यक्ष अलीम ताहीर, माजी सभापती ज्ञानेश्वर चिबडे, बांधकाम सभापती अनिकेत मापारी, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक शाम राऊत, आरोग्य सभापती अब्दुल उबेद, नियोजन सभापती साहेबराव पवार, शिवम मापारी, कुरेशी मुजीब खान, निलेश सुमन, वसीम कुरेशी, अख्तर कुरेशी, ऋषिकेश ठाकरे, निलेश मानवतकर, राजाराम वाटसर, राजेंद्र गायकवाड, दिलीप बोरे, भूषण काळे, विकास मोरे, नामदेवराव राठोड, सत्यनारायण धोंडगे, आशिष देशमुख, वामनराव मोरे, गजानन लांडगे, बाळू वानखेडे, श्रीकृष्ण देशमुख, निसार भाई कुरेशी, मिलिंद खंडारे, मनोज वानखेडे, विजय चव्हाण, शंकर हेंद यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


