मोहट्यातील शासकीय सेवेत नियुक्त झालेल्या गुणवान विद्यार्थ्यांचा सन्मान

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-दुर्गम भागातील ‘यशस्वी हिऱ्यां’च्या कामगिरीचे ग्रामस्थांकडून कौतुक

पाथर्डी (बाळासाहेब खेडकर) : मोहटे गावातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध शासकीय पदांवर नियुक्त झालेल्या गुणवान युवक-युवतींचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. गावातील या ‘यशस्वी हिऱ्यांचा’ सन्मान करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत ग्रामस्थांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

मारुती दहिफळे, मयूर दहिफळे, म्हातारदेव खाडे, अंबादास दहिफळे, प्रशांत दहिफळे, सुरज घुगे, सोनाली घुगे, सीमा दहिफळे आणि प्रियंका पालवे यांची प्राथमिक शिक्षकांसह विविध शासकीय पदांवर नव्याने नियुक्ती झाली आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात मिळविलेले हे यश गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आजच्या स्पर्धेच्या युगात मर्यादित शासकीय नोकऱ्या आणि मोठ्या संख्येने स्पर्धक असताना या युवक-युवतींनी मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी तसेच आई-वडिलांचा त्याग आहे. त्यामुळे आपल्या गावातील लेकरांनी शासकीय सेवेत प्रवेश मिळविल्याचा आनंद व्यक्त करताना अनेक ग्रामस्थ भावूक झाले. काही वक्त्यांच्या भावना व्यक्त करताना कंठ दाटून आला, तर डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी मिळविलेले हे यश गावातील इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल. शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अधिक आत्मविश्वासाने पाहावे, असा संदेश या सन्मान सोहळ्यातून देण्यात आला. यावेळी उपसरपंच अविनाश फुंदे, संदीप पालवे, मारुती खाडे, बाबासाहेब दहिफळे, पोपट खाडे, श्रीधर गिरी, रामकिसन फुंदे, शामराव दहिफळे, सरपंच मनिषा पालवे, पांडुरंग फुंदे, अंबादास पालवे, पांडुरंग दहिफळे, मारुती दहिफळे, अजय आव्हाड, अक्षय गोसावी, अक्षय दहिफळे, रामदास दहिफळे, देविदास दहिफळे, भगवान दहिफळे, मंदाबाई दहिफळे, शिवाजी पालवे, चंद्रकांत पालवे, राजेंद्र पालवे, अविराम दहिफळे, भास्कर दहिफळे, भीमराव दहिफळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version