मोहटादेवी शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाला वेग

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-नवरात्रोत्सवापूर्वी सर्व कामे पूर्ण करा : प्रांताधिकारी प्रशांत मते

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, मोहटे येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर नियोजन व व्यवस्थापनाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. नवरात्रोत्सव सर्व विभागांनी समन्वयाने व एकत्रितपणे पार पाडावा. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन आवश्यक कामे वेळेत हाती घेऊन घटस्थापनेपूर्वी पूर्ण करावीत, असे आवाहन प्रांताधिकारी प्रशांत मते यांनी केले.

बैठकीत प्रांताधिकारी मते यांनी वीज, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, वन विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, राज्य परिवहन महामंडळ तसेच अन्य संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. नवरात्रोत्सवाच्या काळात अखंड व सुरळीत वीजपुरवठा राहण्यासाठी वीज वितरण कंपनीने आवश्यक दुरुस्तीची कामे तत्काळ पूर्ण करावीत. तसेच वीजपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय पथके तैनात करून तातडीच्या उपचारांसह रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि गर्दीच्या ठिकाणी आरोग्यविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने मोहट्याकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविणे, रस्त्यांची दुरुस्ती करणे तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या बाबी दूर करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्या. पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत आवश्यक कामांची माहिती घेऊन ती प्राधान्याने पूर्ण करण्याबाबतही चर्चा झाली. वन विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमणास प्रतिबंध करण्यासह भाविकांना आवश्यक सुविधा मिळण्यासाठी संबंधित उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले.

नवरात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक मोहट्याकडे येत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने जादा बसगाड्यांचे नियोजन करावे. तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासन, आरटीओ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने उत्सवाच्या काळात अवैध दारू, अंमली पदार्थ तसेच बेकायदा विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या. पोलीस प्रशासनाने गर्दीचे नियोजन, वाहतूक व्यवस्था तसेच महिला व ज्येष्ठ भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात. गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी गस्त वाढवावी तसेच मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश देण्यात आले.

बैठकीस प्रांताधिकारी प्रशांत मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद गावकर, बबन मंचरे, राहुल कांबळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राम राजळे, पंचायत समितीचे अभियंता, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रकांत रासकर, पाथर्डी आगारप्रमुख अमित बनसोडे, गोवर्धन दहिफळे, वीज वितरण कंपनीचे रवींद्र कोकरे, डेरे वीज विभागाचे अशोक फुंदे, ग्रामसेवक अशोक फुंदे, उपसरपंच अविनाश फुंदे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, अशोक दहिफळे, शशिकांत दहिफळे, राजेंद्र शिंदे, श्रीकांत लाहोटी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, संपर्क अधिकारी भीमराव खाडे, मुख्य लेखापाल घुले यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version