बळीराजाचा टाहो अन् प्रशासनाच्या दारात रोषाचा वणवा! सोयाबीन फेकून तुपकरांचा एल्गार; विदर्भात शेतकरी आंदोलनाचा डोंब उसळला!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– ‘राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी एक लाखाची मदत द्या!’
– बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळालेल्या सोयाबीनचा ढिगारा; खामगाव ते लोणारमध्ये ‘क्रांतिकारी’चा धडाका!
– शेळगाव आटोळ ते देऊळगाव घुबे; बांधावरच्या करपलेल्या पिकांची पाहणी करत तुपकरांचा सरकारविरोधात हुंकार!

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) — पावसाच्या लहरीपणाने आणि कृत्रिम संकटांनी बळीराजाच्या पाठीत खंजीर खुपसला असतानाच, आता संतापलेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश चव्हाट्यावर आला आहे. पावसातील भीषण खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिके करपून खाक झाली असून, या विदारक परिस्थितीविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन म्हणजे जळत्या वास्तवाचा थेट स्फोट ठरला आहे.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच करपलेल्या सोयाबीनची झाडे फेकत संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा जाहीर निषेध केला आणि आसूड ओढत सरकारला सळो की पळो करून सोडले. ‘कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची भरपाई तात्काळ खात्यात जमा करा,’ अशी गर्जना करत तुपकरांनी राज्यकर्त्यांना थेट आव्हान दिले आहे. केवळ बुलढाणाच नव्हे, तर खामगाव, शेगाव, मलकापूर आणि लोणारमध्येही संघटनेच्या शिलेदारांनी तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयांसमोर प्रशासनाला जाब विचारत रणशिंग फुंकले. लोणारमध्ये तर हलगीच्या दणदणाटात सरकारला जागे करण्याचा अनोखा व आक्रमक पवित्रा घेण्यात आला.

आंदोलनापूर्वी स्वतः रविकांत तुपकर यांनी चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ, इसरुळ आणि देऊळगाव घुबे परिसरातील शेतशिवारात जात शेतकऱ्यांच्या बांधावर तुडवलेल्या पिकांची पाहणी केली व त्यांच्या डोळ्यातले अश्रू टिपत हक्कासाठी पेटून उठण्याचे आवाहन केले. वीजपुरवठा सुरळीत करणे, जळालेले ट्रान्सफॉर्मर बदलणे, रखडलेला पीकविमा तात्काळ देणे, सीबिल खराब होण्यापासून वाचवण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन करणे आणि सरसकट कर्जमाफीसह नियमित कर्जदारांना २ लाखांचे प्रोत्साहन अनुदान देण्याच्या मागण्यांसाठी आता हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता केवळ आश्वासनांची खैरात नको, तर थेट मदतीचे तडाखे हवेत; अन्यथा हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पेटवून सरकारची नथी लाटल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम याप्रसंगी भरण्यात आला.

याप्रसंगी शेतकरी नेते शेणफडराव घुबे, देविदास कणखर, एकनाथ थूट्टे पाटील, दामोदर शर्मा, विनायक सरनाईक, चिखली सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, रंजीत डोसे, मुरली महाराज येवले, राजू ठाकूर, रितेश पाटील, राजू शेटे, गणेश थुटे, अमोल मोरे, रामेश्वर अंभोरे, विठ्ठल वानखेडे, सुनील करांगळे, आत्माराम कुटे, विलास मुजमुले, दिनकर घुबे, रामू हिवराळे, अशोक डांगे, रामदास शिंदे, नंदकिशोर बारस्कर, पांडुरंग घुबे यांच्यासह हजारो शेतकरी व कार्यकर्ते या एल्गारात सहभागी झाले होते.

Share This Article
Exit mobile version