-ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद घेण्याच्या मागणीसाठी बौद्ध समाजाचे पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू
चिखली (महेंद्र हिवाळे) : तालुक्यातील वळती येथील बौद्ध विहार तसेच बौद्ध स्मशानभूमीची ग्रामपंचायत रेकॉर्डवर तात्काळ नोंद घ्यावी, या मागणीसाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी पत्रव्यवहार करून तसेच सामाजिक नेत्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, ही मागणी सातत्याने हेतुपुरस्सर दुर्लक्षित केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या मागणीसाठी अखेर १५ सप्टेंबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेबीताई हिवाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते तसेच वळती येथील बौद्ध समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. या मागणीची तीव्रता लक्षात न घेता, मंत्रालयातून पत्रव्यवहार होऊनही वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ही बाब अत्यंत चिंतेची व बेकायदेशीर असल्याचेही आंदोलकांचे म्हणणे आहे. सरपंच पती व ग्रामसेवक या मागणीच्या बाबतीत जाणीवपूर्वक व बेकायदेशीर भूमिका बजावत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी नाराजीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात आले. हा प्रश्न केवळ वळती येथील बौद्ध समाजाचा नसून चिखली तालुक्यातील संपूर्ण बौद्ध समाजाचा प्रश्न असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील बौद्ध समाज एकत्र येत असून, विविध आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
जोपर्यंत बौद्ध विहार व बौद्ध स्मशानभूमीची ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद घेण्याची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेण्याची जबाबदारी निर्माण झाली आहे. या उपोषण मंडपाला प्रशांत डोंगरदिवे, विजयकांत गवई, सलीम भाई, अमोल लहाने, राजू झिने यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. यावेळी बेबीताई हिवाळे, रिपाई नेते भाई संजय वाकोडे, भीमराव हिवाळे, शरद हिवाळे, कचरू हिवाळे, शेषराव हिवाळे, सागर हिवाळे, अमोल हिवाळे, संजय हिवाळे, अशोक जाधव, मनोज हिवाळे, प्रकाश हिवाळे, लक्ष्मी धनराज, कचरूबाई खरात, अनिता हिवाळे, शिलाबाई हिवाळे, सिंधूबाई पवार, मंदा हिवाळे, लिंबाजी गवई, सुनंदा हिवाळे, पप्पू हिवाळे, मनोहर खरात यांच्यासह वळती येथील बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

