-सहदेव लाड यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी; ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश न केल्यास सिंदखेडराजात बैलजोड्यांसह बेमुदत रास्ता रोकोचा इशारा
बिबी (ऋषी दंदाले) : बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी, पीकविमा मिळावा तसेच अन्य मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी लोणार तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाव’ आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी वाळलेली सोयाबीन हाती घेत डफडे वाजवत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
मागील एक ते दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्यामुळे जवळपास ९० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा दावा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केला. दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्जमाफी करावी तसेच मागील वर्षीचा आणि यावर्षीचा १०० टक्के पीकविमा मिळावा, अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोणार तहसील कार्यालयासमोर डफडे वाजवत आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरम्यान, या आंदोलनाची ३० सप्टेंबरपर्यंत दखल घेऊन बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत समावेश न केल्यास सिंदखेडराजा येथे बैलजोड्यांसह इतर शेती उपयोगी साहित्य रस्त्यावर आणून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सहदेव लाड यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
