-“दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाखांची मदत द्या, बुलढाण्याला दुष्काळाच्या यादीत घ्या; सरकार आणि नेत्यांना शेतकऱ्यांसाठी काम करण्याची सद्बुद्धी द्या!”
बुलढाणा (सुरेश हुसे) : डफड्याचा ताल, सजवलेली बैलगाडी आणि तिचे सारथ्य करणारे रविकांत तुपकर… अशा पारंपरिक आणि लक्षवेधी वातावरणात बुलढाणा शहरात शेतकऱ्यांच्या ‘क्रांतिकारी राजा’चे दणक्यात आगमन झाले. श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चिखली रोडवरील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटरसमोर यंदाही मोठ्या उत्साहात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. ‘शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी राजा’च्या प्रतिष्ठापनेचे हे पाचवे वर्ष आहे.
यंदा महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या संकटाला सामोरा जात आहे. पावसाची अनिश्चितता, पिकांचे नुकसान आणि वाढत्या आर्थिक अडचणींमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर तुपकरांनी ‘क्रांतिकारी राजा’समोर शेतकऱ्यांसाठी साकडे घातले. “संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी, दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाण्यासह इतर पात्र जिल्ह्यांचा समावेश व्हावा आणि सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना समजण्याची सद्बुद्धी मिळावी,” अशी प्रार्थना तुपकरांनी केली.
“सत्ताधारी नेत्यांनी व्यक्तिगत स्वार्थ आणि आपापसांतील भांडणांमध्ये वेळ न घालवता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढण्याचे बळ दाखवावे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची सद्बुद्धी त्यांना मिळावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘क्रांतिकारी राजा’समोर आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. त्यामुळे गणरायाच्या दर्शनासाठी तसेच देखावा पाहण्यासाठी नागरिकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

