-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर; अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात अनुराधा अभियांत्रिकीचा दबदबा
चिखली (महेंद्र हिवाळे) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन टेबल टेनिस (मुली) स्पर्धेत अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, चिखलीच्या मुलींच्या संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे ९ ते १२ सप्टेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत अमरावती विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये अनुराधाच्या महिला संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विद्यापीठ विजेतेपदावर नाव कोरले.
स्पर्धेतील अंतिम सामना बी झोनमधील अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, चिखली आणि ए झोनमधील आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोला यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात अनुराधाच्या खेळाडूंनी संयमी, आक्रमक आणि अचूक खेळाचे प्रदर्शन करत पाचपैकी तीन सामने जिंकून विजेतेपदावर कब्जा केला. आर.एल.टी. विज्ञान महाविद्यालय, अकोला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विजयी संघामध्ये कु. वैष्णवी ठेंग, कु. सुजाता अनिल माटे, कु. जया मोकाशे, कु. सृष्टी घट्टे आणि कु. रुतुजा शेटे या खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याची प्रभावी छाप पाडली. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी उत्कृष्ट समन्वय, आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि जिंकण्याची जिद्द दाखवली. अंतिम सामन्यातील निर्णायक क्षणी दाखविलेल्या संयमी खेळामुळे अनुराधाच्या संघाला विजेतेपद मिळविण्यात यश आले. खेळाडूंनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मिळविलेले हे यश अभिमानास्पद आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राला अनुराधा परिवाराकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. विद्यापीठस्तरीय स्पर्धेत मुलींच्या संघाने विजेतेपद मिळवून अनुराधा महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. या यशामागे खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयाचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आहे. भविष्यातही या खेळाडूंनी विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले.
यावेळी विजयी संघाचे अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई म्हणाले की, अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुलींनी अंतिम सामन्यात दाखविलेली एकजूट, आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द कौतुकास्पद आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखत पाचपैकी तीन सामने जिंकून संघाने विजेतेपद पटकावले, ही महाविद्यालयासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य व्यासपीठ आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सदैव प्रयत्नशील राहील. या यशातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल आणि भविष्यात अनुराधाचे खेळाडू उच्च स्तरावर महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुराधा परिवाराकडून शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. विद्यापीठस्तरीय स्पर्धेत मुलींच्या टेबल टेनिस संघाने मिळविलेले हे यश महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव वाटचालीची साक्ष देणारे ठरले आहे. या संघाच्या यशासाठी डॉ. नागेश मापारी, प्रा. अश्विन ज्ञानसुंदर आणि क्रीडा विभागाचे दिलीप लंके यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आ. राहुलभाऊ बोंद्रे, सचिव अॅड. वृषालीताई बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ. व्ही. आर. यादव, कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वानेरे, विश्वस्त वर्धमानशेठ डहाळे, आत्माराम देशमाने, अथरोद्दीन काझी आणि कार्यकारी संचालक डॉ. एम. एस. अली यांनी विजयी टेबल टेनिस संघाचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ झोनमध्ये विजेतेपद मिळवत अनुराधाच्या मुलींनी केवळ महाविद्यालयाचे नाव उंचावले नसून, क्रीडा क्षेत्रातही अनुराधा परिवाराची विजयी परंपरा कायम ठेवली आहे.

