-नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; नागरिक-भाविकांत नाराजी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने इंद्रायणी नदीच्या वाढत्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आळंदी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा केंद्रापासून इंद्रायणी नदीच्या उत्तर व दक्षिण दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने मृत मासे आढळून आले आहेत. नदी प्रदूषणामुळे वारकरी, भाविक आणि नागरिकांमध्ये मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात सांडपाणी तसेच रसायनमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असल्याची भावना व्यक्त होत आहे. पीएमआरडीए व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दुर्लक्षाबरोबरच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यक्षेत्रातील या प्रकाराकडेही डोळेझाक होत असल्याचा आरोप असल्याने आळंदीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह कंपन्यांकडून पाणी प्रक्रिया नकरता सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने आळंदी परिसरात नदीचे प्रदूषण वाढले असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका समोर आल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
आळंदीतील पाणीपुरवठा साठवण बंधारा परिसरात दक्षिण व उत्तर दिशेला नदीकिनाऱ्यालगत असंख्य मासे मृत झाल्याचे दिसून आले. तीर्थक्षेत्र अलंकापुरी येथील इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून केमिकल व रसायनमिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत येत असल्यामुळे नदीतील जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले असून, हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतील इंद्रायणी नदी पाणी साठवण बंधारा ते चिंबळी बंधारा या दरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला असून, भाविक व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
प्रदूषण रोखण्यासाठी कारवाईची मागणी
अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमआरडीए आयुक्त यांना इंद्रायणी नदीचे प्रदूषण तत्काळ रोखण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आवश्यक उपाययोजना करून नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तत्काळ कारवाई करावी आणि दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष वैभवराज रौंदळ आणि पुणे जिल्हा धार्मिक प्रकोष्ठ अध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी संबंधित प्रशासनाकडे देऊन लक्ष वेधले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले असून, पुंडलिक मंदिरापासून डुडुळगावच्या पुलापर्यंत पाहणी केली असता अनेक ठिकाणी मृत मासे आढळून आल्याचे अर्जुन मेदनकर यांनी सांगितले. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरवर्षी इंद्रायणी नदीला अशा प्रकारे प्रदूषणाचा फटका बसत असल्याचेही त्यांनी सांगितले. नदीच्या पात्रात अनेक कंपन्यांचे केमिकलमिश्रित पाणी येत असल्यामुळे मासे मृत होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यंदाही मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे त्यांनी नमूद केले. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास भविष्यात वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने देण्यात आला आहे.

