जानेफळ पोलिसांची अवैध दारूवर करडी नजर!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-लावणा बसथांब्यावर अवैध दारूसाठा पकडला; देशी दारूसह १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच जानेफळ पोलिसांनी ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई केली. या कारवाईत ८ हजार रुपये किमतीचा देशी दारूसाठा, मारुती सुझुकी अल्टो कार आणि मोबाईल असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १३ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास लावणा बसथांब्यावर करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पिंप्री माळी येथील एका व्यक्तीला लावणा बसथांब्यावर ताब्यात घेऊन त्याच्याकडून अवैध देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ९० मिलीच्या सखु संत्रा टँगो प्रीमियम कंपनीच्या १२० बाटल्या, किंमत ४ हजार ८०० रुपये, तसेच ९० मिलीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या ८० बाटल्या, किंमत ३ हजार २०० रुपये, असा एकूण ८ हजार रुपयांचा देशी दारूसाठा जप्त करण्यात आला. यासोबतच मारुती सुझुकी अल्टो कार (एमएच-२० एजी-८३७२), किंमत १ लाख १० हजार रुपये, आणि वनप्लस कंपनीचा जुना वापरातील मोबाईल, किंमत १५ हजार रुपये, असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल भागवत पाटोळे यांच्या फिर्यादीवरून जानेफळ पोलिस ठाण्यात कायमी अप. क्र. ३१६/२०२६, कलम ६५(ई), महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वाहनासह पोलिस ठाण्यात आणून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आरोपीस सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिस अंमलदार लक्ष्मण पिटकर यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष जाधव करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version