-शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचे आवाहन
बिबी (ऋषी दंदाले) : शासनाच्या वतीने नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्याच्या मागणीसाठी उद्या, १५ सप्टेंबर रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लोणार तहसील कार्यालयासमोर ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.
मागील जवळपास दीड महिन्यापासून महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी यासह इतर पिकांच्या उत्पादनात ९० टक्क्यांपर्यंत घट झाली असून, शेतकऱ्यांनी केलेला उत्पादन खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
असे असतानाही शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकार झोपेचे सोंग घेत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी लोणार तहसील कार्यालयासमोर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने ‘ढोल वाजवा’ आंदोलन करण्यात येणार असून, या माध्यमातून सरकारचे लक्ष बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीकडे वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे.

