ऊसतोडणीवरून वाद; मारहाणीनंतर तरुणाने घेतला गळफास

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-कोनोशी येथील घटनेप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; खुनाची धमकी दिल्याचा फिर्यादीचा आरोप

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) : ऊसतोडणीसाठी कोणत्या मुकादमासोबत जावे, यावरून झालेल्या वादातून तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने त्याने मानसिक त्रासातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोनोशी (ता. शेवगाव) येथे घडली. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादासाहेब अर्जुन खेडकर (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे वडील अर्जुन गणपत खेडकर (वय ६०, रा. कोनोशी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कैलास माणिक बडे, विष्णू बाजीराव खाडे, सारिका विष्णू खाडे, ज्ञानेश्वर बाजीराव खाडे आणि सविता ज्ञानेश्वर खाडे (सर्व रा. कोनोशी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १०८, ११८(१), ११५(२), १८९(२), १९०, ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाजीराव भानुदास सानप करीत आहेत.

ऊसतोडणीच्या मुकादमावरून वाद

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, अर्जुन खेडकर व त्यांचा मुलगा दादासाहेब हे शेतीसोबत दरवर्षी ऊसतोडणीचे काम करीत होते. यावर्षी गंगामया साखर कारखान्यावर ऊसतोडणीसाठी जाण्यासाठी त्यांनी मुकादम देविदास निवृत्ती कराड (रा. येळी, ता. पाथर्डी) यांच्याकडून ९० हजार रुपये उचल घेतली होती. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे पावणेसात वाजता खेडकर यांच्या घरासमोर कैलास बडे, विष्णू खाडे, सारिका खाडे, ज्ञानेश्वर खाडे व सविता खाडे हे आले. यावेळी त्यांनी खेडकर पिता-पुत्राला त्यांच्यासोबत ऊसतोडणीसाठी येण्यास सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, आधीच दुसऱ्या मुकादमाकडून ९० हजार रुपये उचल घेतल्याने त्यांच्यासोबत येणे शक्य नसल्याचे दादासाहेब व त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यानंतर वाद वाढला.

मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, कैलास बडे, विष्णू खाडे व ज्ञानेश्वर खाडे यांनी दादासाहेब यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून, ‘तू आमच्यासोबत ऊसतोडणीला आला नाहीस तर तुझा खून करू,’ अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. सारिका खाडे व सविता खाडे यांनी दादासाहेब तसेच अर्जुन खेडकर यांना चपलेने मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार सुरू असताना दादासाहेब यांचा भाऊ कानिफ, सून मनिषा आणि पुतण्या आजीनाथ रामदास खेडकर यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर आरोपींनी ‘तुम्ही दुसऱ्या मुकादमाकडे ऊसतोडणीला गेलात तर तुमचे हात-पाय काढून टाकू’ तसेच ‘उद्यापासून तुम्ही रस्त्यावर कसे फिरता ते पाहतो,’ अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

अपमानामुळे दादासाहेब मानसिक तणावात

मारहाणीच्या घटनेनंतर दादासाहेब अत्यंत घाबरले होते. त्यांना झालेल्या मारहाणीमुळे आणि धमकीमुळे ते मानसिक तणावात असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ‘माझी काही चूक नसताना महिलांनी मला चपलेने मारहाण केली. माझी गावात काही इज्जत आहे की नाही,’ असे म्हणत दादासाहेब रडत असल्याचे त्यांच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. रात्री सुमारे ११ वाजता कुटुंबीय झोपले. दुसऱ्या दिवशी १२ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास दादासाहेब यांची पत्नी मनिषा झोपेतून उठली असता, घराच्या खिडकीतून दादासाहेब यांनी घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लांब रुमालाने गळफास घेतल्याचे दिसले.

दरवाजा तोडून बाहेर काढले

मनिषाने आरडाओरड केल्यानंतर कुटुंबीयांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. दादासाहेब यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून त्यांना तातडीने उपचारासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

विधी आटोपल्यानंतर पोलिसांत तक्रार

दादासाहेब यांच्या अंत्यविधीनंतर १३ सप्टेंबर रोजी अर्जुन खेडकर यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक बाजीराव सानप पुढील तपास करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version