-दीर्घ आजाराने वयाच्या ७७व्या वर्षी निधन; शिक्षक, शिक्षण संघटना व सहकार क्षेत्रातील योगदानाची प्रदीर्घ कारकीर्द
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गोरेगाव येथील मूळ रहिवासी आणि बुलढाणा येथे स्थायिक झालेले सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी माणिकराव परशराम पांचाळ यांचे १२ सप्टेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ७७ वर्षे होते. कै. माणिकराव पांचाळ यांनी बुलढाणा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटना, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक पतसंस्था तसेच जिजामाता गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविले होते. साखरखेर्डा येथील सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचेही ते संचालक होते.
अल्प परिचय
माणिकराव परशराम पांचाळ हे मूळचे सिंदखेडराजा तालुक्यातील मौजे गोरेगाव येथील रहिवासी असून, नोकरीनिमित्त ते बुलढाणा येथे स्थायिक झाले होते. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या माणिकराव पांचाळ यांचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण गोरेगाव येथील मराठी प्राथमिक शाळेत झाले. आदर्श व शिस्तप्रिय शिक्षक स्व. पुंडलिक जगताप गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर वर्गात नेहमी प्रथम क्रमांक कायम ठेवला. पुढे इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण साखरखेर्डा येथील एस.ई.एस. हायस्कूलमध्ये पूर्ण केले. प्रत्येक वर्गात प्रथम क्रमांक मिळवित त्यांनी खो-खो या खेळातही प्राविण्य मिळविले. पुढे विज्ञान विषयातील उच्च शिक्षणासाठी त्यांनी खामगाव येथील जी.एस. कॉलेज ऑफ सायन्स, आर्ट्स अँड कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. विज्ञान आणि गणित विषय घेऊन त्यांनी १९६६ मध्ये प्री-युनिव्हर्सिटीला प्रवेश घेतला. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही. १९७० मध्ये त्यांनी बी.एस्सी. (गणित) ही पदवी प्राप्त केली.
त्या काळात आजूबाजूच्या दहा-बारा गावांतून एखादाच बी.एस्सी. (गणित) पदवीधर मोठ्या मुश्किलीने सापडत असे. त्यामुळे विज्ञान पदवीधारकांना मोठी मागणी होती. माणिकराव पांचाळ यांना त्याच काळात बुलढाणा जिल्हा परिषदेच्या बुलढाणा येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत गणित शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. वयाच्या २१-२२व्या वर्षी त्यांनी नोकरीला सुरुवात केली. लवकरच एक नामवंत गणित शिक्षक म्हणून त्यांनी शहरात नावलौकिक मिळविला. सुमारे ३३ वर्षे बुलढाणा येथे शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांना पंचायत समिती, बुलढाणा येथे गटशिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती मिळाली. या पदावर दोन वर्षे सेवा बजावल्यानंतर नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाले आणि त्यानंतर सामाजिक कार्यात सहभागी झाले.
शिक्षक म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. विशेष बाब म्हणजे बुलढाणा येथील जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण सहकारी संस्था ही त्या काळातील बुलढाणा येथील पहिली गृहनिर्माण सहकारी संस्था होती, जी प्रत्यक्ष बांधकामापर्यंत पोहोचली होती. मध्यंतरी गृहनिर्माण संस्थेला निधी अपुरा पडल्यामुळे बांधकाम बंद पडले होते. अशा परिस्थितीत माणिकराव पांचाळ यांनी सहकारमहर्षी कै. भास्करराव शिंगणे यांच्याकडे आग्रह धरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज मिळवून घेतले. त्यामुळे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या घरकुलांचे बांधकाम बंद पडू दिले नाही. अखेर कर्मचाऱ्यांच्या घरांचे बांधकाम पूर्ण झाले आणि शेकडो जिल्हा परिषद तसेच राज्य शासनातील कर्मचारी स्वतःच्या घरात राहायला गेले. बुलढाण्यासारख्या ठिकाणी त्या काळात स्वतःचे घर असणे ही मोठी बाब मानली जात होती. मात्र, माणिकराव पांचाळ यांच्या पुढाकारातून कर्मचारी गृहनिर्माण संकुलाची निर्मिती झाली, हे त्यांच्या कार्यातील महत्त्वाचे योगदान मानले जाते. शिक्षण, शिक्षक संघटना, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे माणिकराव पांचाळ यांच्या निधनाने एक मार्गदर्शक आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

