– ‘बाप तो बाप रहेगा, पण बाई बापासारखं शरीर कुठून आणणार?’ आ. गायकवाड यांच्या विधानावरून बुलढाणा शहर पोलिसांत गुन्हा दाखल
बुलढाणा (सुरेश हुसे) : शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. महिलांच्या शारीरिक ठेवणीवर आक्षेपार्ह टिप्पणी आणि वक्तव्य करणे आमदार गायकवाड यांना चांगलेच भोवले आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री आमदार गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आणि शिंदेसेनेतील राजकीय संघर्ष आता थेट पोलिसांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.
“बाप तो बाप रहेगा, हे ठीक आहे. मात्र, हे विधान एखाद्या पुरुषाने केले तर चालेल; पण एखाद्या बाईने म्हटले की ‘बाप तो बाप आहे’, तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार?” असे म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका केली होती. आमदार गायकवाड यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
समस्त स्त्री जातीचा अवमान – तक्रारदार महिला
आमदार गायकवाड यांच्या या विधानामुळे महिलांच्या लज्जेला धक्का पोहोचला असून, हे कृत्य हेतुपुरस्सर करण्यात आले आहे, असा आरोप रामदेवबाबा नगर येथील ४२ वर्षीय महिला तक्रारदार यांनी केला आहे. आमदारांचे हे वक्तव्य समस्त स्त्री जातीचा अवमान करणारे आणि मानसिक त्रास देणारे असल्याचे नमूद करत त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.
महिला तक्रारदाराच्या या अर्जाची गंभीर दखल घेत बुलढाणा शहर पोलिसांनी मध्यरात्रीच आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम ७९ (महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे शब्द उच्चारणे किंवा कृत्य करणे) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुषमा रामभाऊ पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
स्थानिक पातळीवरील भाजप आमदार श्वेता महाले आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील हा वाद आता चांगलाच टोकाला गेला असून, महायुतीमधील हा अंतर्गत संघर्ष पोलिसांच्या दारात पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी आता वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात आणि आमदार गायकवाड यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

