आळंदी पोलिसांची रातोरात कारवाई; अपहरण करून गंभीर मारहाण करणारे तिघे ताब्यात

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-लोखंडी रॉड, लाकडी दांडके व बेल्टने मारहाण; CCTV व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इसमाचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला अज्ञात ठिकाणी नेऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर मारहाण केल्याच्या घटनेत पोलिसांनी रातोरात कारवाई करत तिन्ही आरोपींना मोशी परिसरातून ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या इसमाचा तातडीने शोध घेऊन त्याला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता आळंदी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. आरोपींनी संबंधित इसमास जबरदस्तीने किडनॅप करून अज्ञात ठिकाणी नेले. त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी दांडके, कमरेचा बेल्ट तसेच हाताबुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. लोखंडी रॉडने मारहाण केल्याने त्याचे दात पडले असून, डोक्यात लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने गंभीर जखमा करण्यात आल्या. तसेच कानावर वार करून कान कापल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित इसम मयत झाल्याचे समजून आरोपींनी त्याला रस्त्याच्या कडेला टाकून घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

तांत्रिक तपासासह रात्रभर CCTVची तपासणी

घटनेची माहिती मिळताच DCP मारुती जगताप, झोन-३, ACP योगेश रांजनकर, ACP Crime सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके, आळंदी पोलीस ठाणे तसेच Crime Unit-३ चे PI कसबे आणि API सुनील वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे तात्काळ गतिमान करण्यात आली. DB पथकाचे प्रभारी PSI राहुल दूधमल यांच्या नेतृत्वाखाली HC फुले, PC डिखले, PC डुमनार, PC सूर्यवंशी, PC नरवाडे, PC सातपुते व HC दोडके यांची तपास पथके तयार करून आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला. आरोपींच्या मोबाईल लोकेशनसह CDR, SDR तसेच इतर तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. त्याचबरोबर पथकाने रात्रभर विविध ठिकाणचे CCTV फुटेज तपासून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला. अथक परिश्रम, अचूक तांत्रिक तपास आणि योग्य नियोजनाच्या आधारे आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला.

मोशी परिसरातून तिघांना ताब्यात

अखेर रातोरात मोशी परिसरातून तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आळंदी पोलीस ठाण्याच्या DB पथकाला यश आले. तसेच गंभीररीत्या जखमी झालेल्या इसमाचा तातडीने शोध घेऊन त्याला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्याला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्यात वेगवान प्रतिसाद, तांत्रिक तपास, CCTV विश्लेषण, अचूक नियोजन आणि रात्रभर केलेल्या अथक परिश्रमांच्या जोरावर अवघ्या काही तासांत आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई DCP मारुती जगताप, ACP योगेश रांजनकर, ACP Crime सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Share This Article
Exit mobile version