-भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू; नगरपरिषदेस आवश्यक माहिती देण्याचे आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : स्वच्छ, सुरक्षित आणि रेबीजमुक्त तीर्थक्षेत्र आळंदीसाठी सर्व नागरिकांनी तसेच सोसायट्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.
भटक्या कुत्र्यांची माहिती नगरपरिषदेला द्यावी
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपल्या परिसरातील, गल्ली-बोळांतील किंवा सोसायटीच्या आवारातील निर्बीजीकरण न झालेल्या भटक्या कुत्र्यांची अचूक माहिती नगरपरिषदेला देणे आवश्यक आहे. माहिती देण्यासाठी समन्वय अधिकारी पंकज खैरे, नगरपरिषद कर्मचारी, आळंदी नगरपरिषद यांच्याशी ९८६००७४५२३ या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरिकांनी या क्रमांकावर फोन करून अथवा व्हॉट्सॲपद्वारे माहिती द्यावी. आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांची अंदाजे संख्या, नेमके ठिकाण आणि आवश्यक तपशील वरील क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शस्त्रक्रियेनंतर श्वानांना मूळ ठिकाणी सोडणार
ही मोहीम शासनाच्या नियमांनुसार सुरक्षितरीत्या राबविण्यात येत असून, शस्त्रक्रिया व लसीकरणानंतर श्वानांना काळजीपूर्वक पुन्हा त्याच अधिवासात म्हणजेच मूळ ठिकाणी सोडण्यात येणार असल्याचे आरोग्य विभाग प्रमुख यांनी सांगितले. स्वच्छ, सुरक्षित आणि रेबीजमुक्त तीर्थक्षेत्र आळंदी निर्माण करण्यासाठी सर्व नागरिकांनी व सोसायट्यांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे.

