तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी रस्त्यांचा ‘मास्टर प्लॅन’!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-कानिफनाथ दर्शनासाठी वाढती गर्दी; मढी-मायंबा-वृद्धेश्वर-मोहटादेवीसह शिर्डी, शनिशिंगणापूर देवस्थाने जोडण्याचा आराखडा : आमदार मोनिका राजळे

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थानाचा देशभरात नावलौकिक वाढत असताना भाविकांची वाढती गर्दी आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मढीसह प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारे रस्ते रुंद व सक्षम करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. मढी-मायंबा-वृद्धेश्वर-मोहटादेवीसह शिर्डी व शनिशिंगणापूर या तीर्थक्षेत्रांना उत्तम रस्ते कनेक्टिव्हिटी देण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली.

श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथ देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सुविधेसाठी खरेदी करण्यात आलेल्या नवीन बसचे लोकार्पण आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. हभप अशोक महाराज मरकड, श्रीराम महाराज मचे व पोपट महाराज मरकड यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.

अमावस्या-पौर्णिमेला वाहतुकीचा बोजवारा

मढी येथे अमावस्या, पौर्णिमा तसेच विविध धार्मिक उत्सवांच्या काळात राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नाथभक्त दाखल होतात. भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सध्याच्या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढत आहे. मढी परिसरासह पाथर्डी-शेवगाव तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने भविष्यातील गर्दीचा विचार करून रस्ते विकासाचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचे राजळे यांनी स्पष्ट केले.

‘तीर्थक्षेत्र सर्किट’ला चालना देण्याचा प्रयत्न

आमदार राजळे म्हणाल्या, मढीच्या कानिफनाथांच्या दर्शनासाठी येणारे भाविक मायंबा येथील मच्छिंद्रनाथ, वृद्धेश्वर येथील आदिनाथ, मोहटादेवी, भगवानगड तसेच तारकेश्वर गडाचे दर्शन घेतात. त्यामुळे या सर्व धार्मिक स्थळांना परस्पर जोडणारे रस्ते रुंद, सुरक्षित आणि दर्जेदार होणे आवश्यक आहे. याशिवाय शिर्डी व शनिशिंगणापूरसारख्या देशभरातील प्रसिद्ध देवस्थानांशीही चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत मढीतील सध्याच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. निवास व्यवस्था, स्वच्छ पाणी, वाहनतळ, महाप्रसाद आदी सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने पुढाकार घ्यावा. विश्वस्त मंडळाने एकोप्याने काम करून भविष्यातील गर्दीचा विचार करून सुविधांचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. देवस्थान परिसरात प्रसाद, हार-फुले व अन्य साहित्य विक्रेत्यांचे अतिक्रमण असल्यास ते सामोपचाराने दूर करून परिसर मोकळा ठेवण्याची गरज आहे. भाविक आणि वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, याची जबाबदारी विक्रेत्यांनीही घ्यावी, असे राजळे यांनी सांगितले.

शासनाकडील विकासकामांचे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून, विश्वस्त मंडळानेही शासन दरबारी पाठपुरावा वाढवावा. मढीचा धार्मिक लौकिक देशभर वाढत असताना त्याला साजेशा पायाभूत सुविधा उभारण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही आमदार राजळे यांनी स्पष्ट केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, सचिव माधुरी मरकड, विश्वस्त उषा मरकड, मदन मरकड, उत्तम मरकड, महादेव कोकाटे, अनिल साठे, सुभाष बर्डे, विष्णुपंत अकोलकर, धीरज मैड, पुरुषोत्तम आठरे, रवींद्र वायकर, भगवान मरकड, शिवाजी मोहिते, सचिन वायकर, जमीर आतार, राधाकिसन मरकड, रवींद्र आरोळे, भाग्येश मरकड, अण्णासाहेब मरकड, बाळासाहेब मरकड, वैभव देशमुख, उद्धव ससे, सुनील कदम, मढी सेवा सोसायटीचे चेअरमन विष्णू मरकड, पोपट घोरपडे, जनार्दन मरकड, एकनाथ मरकड, चंद्रभान पाखरे, बाबासाहेब कुटे, ट्रस्टचे व्यवस्थापक संजय मरकड यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version