बुलढाण्यात हुकूमशाही चालणार नाही!; आ. श्वेताताई महाले यांनी ठणकावले!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा कुणाला अधिकार नाही; कायदेशीर कारवाईची शक्यता तपासणार! : आ. श्वेताताई महाले
– दुष्काळप्रश्नी सरकार गंभीर; संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचे मंत्र्यांकडून आश्वासन

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून, चिखलीच्या भाजप आमदार श्वेताताई महाले पाटील आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील कलगीतुरा टोकाला पोहोचला आहे. वाढदिवसानिमित्त झालेल्या शक्तिप्रदर्शनावरून सुरू झालेल्या वादात आता वैयक्तिक टीकानंतर कायदेशीर संघर्षाची ठिणगी पडली आहे. “हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही,” असा स्पष्ट इशारा देत आमदार महाले यांनी आ.गायकवाडांच्या आव्हानावर प्रसारमाध्यमांशी बोलताना जोरदार पलटवार केला आहे.

वाढदिवसाच्या कार्यक्रमात कोटींची उधळण केल्याचा गंभीर आरोप आ. संजय गायकवाड यांनी केला होता. यावर प्रत्युत्तर देताना, “आमच्या कुटुंबाने यात पाच पैशांचाही खर्च केला नाही. जे काही घडले ते मित्रांनी स्वेच्छेने केले असून, हा जनतेच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा विजय आहे,” असे आ. महाले यांनी स्पष्ट केले. तसेच, “मी तुमच्या रॅलीला धाड नाक्यावरून परत पाठवले असते,” या आ. गायकवाडांच्या वक्तव्याचा समाचार घेत, बुलढाणेकर अशा दडपशाहीला भीक घालत नाहीत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आ. संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर तीव्र संताप व्यक्त करत, आ. महाले यांनी कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. “बापासारखे शरीर कुठून आणणार?” या विधानाचा समाचार घेत त्या म्हणाल्या, “बाप काढणे आणि बोलणे हे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. तुम्ही आमदार असलात तरी कुठल्याही महिलेच्या शरीराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. याबाबतीत वकिलांचा सल्ला घेऊन कायदेशीर मार्गाने जाणार आहे. ज्यांच्यावर तसे संस्कार आहेत, त्यांनी ती भाषा वापरावी.” जनतेने विधानसभेत खरा ‘बाप’ कोण हे निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिल्याचे सांगत त्यांनी आ. गायकवाडांच्या मताधिक्यावरूनही टोला लगावला.

बाप जर कुणी असेल तर सर्वसामान्य जनतेला मी बाप मानते. बाप काढणे आणि बोलणे हे संस्कार माझ्यावर झालेले नाहीत. वकिलांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करणार आहे. ज्यांच्यावर ते संस्कार झालेले असतील, त्याठिकाणी त्यांनी त्यांचा बाप दाखवावा, ती भाषा बोलावी. जनता खरा बाप असून विधानसभेत खरा बाप कोण आहे? हे जनतेने दाखवून दिले. त्यांना 80 हजाराच्या मतांच्या आघाडीची अपेक्षा होती, तेच 500-600 वर आले, असेही यावेळी आ. श्वेताताई महाले म्हणाल्या.

विकास कामांचा मुद्दा बाजूला ठेवून इतर मतदारसंघांमध्ये ढवळाढवळ करणे योग्य नाही, अशा शब्दांत आ. महाले यांनी शिवसेना आमदारांवर निशाणा साधला. महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, अशी आठवण त्यांनी करून दिली. दरम्यान, जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीवर बोलताना, मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी चर्चा झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version