– पुण्यातील दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला पुरस्कार; शैक्षणिक वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव!
चिखली (अंकुश पाटील) – शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची दखल घेत साखरखेर्डा येथील सहकार विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका मिस. मर्लिन सिल्वेस्टर यांना ‘सा. उपदेशक शिक्षक गौरव पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या राज्यस्तरीय यशाने संपूर्ण सहकार विद्या मंदिर परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे.
‘सा. उपदेशक’ आयोजित राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळ्यांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आधुनिक शिक्षणपद्धतीचा अवलंब आणि शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी मिस. सिल्वेस्टर यांच्या कार्याची राज्य पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
पुण्यातील नानापेठ येथील वाय.एम.सी.ए. शांतिसुंदर हॉलमध्ये ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या शिस्तबद्ध, कार्यतत्पर आणि विद्यार्थीकेंद्रित नेतृत्वामुळेच शाळेच्या प्रगतीला एक नवी दिशा मिळाली आहे. या गौरवास्पद यशाबद्दल शाळा समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच परिसरातील पालक वर्गाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समर्पित अध्यापन आणि उत्कृष्ट नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी मिळवलेले हे यश खरोखरच प्रेरणादायी आहे.
त्यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल सहकार विद्या मंदिरचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार अंकुश थुट्टे पाटील भरोसा येथील पालक विष्णु थुट्टे, गणेश घुबे, शंकरराव घुबे, तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या गौरवास्पद कामगिरीमुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे.

