पावडे चौक नामांतरावरून वर्धेत संतापाची लाट; ऐतिहासिक संदर्भ जपण्याची नागरिकांची आक्रमक मागणी

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

– पाच दशकांची परंपरा असलेला ‘पावडे चौक’ कायम ठेवा; नामांतराच्या हालचालींवर वर्धेकरांचा तीव्र आक्षेप
– स्वातंत्र्यसेनानी भय्याजी पावडे आणि डॉ. अरुण पावडे यांच्या योगदानाशी जोडलेली आहे शहराची भावनिक नाळ!

वर्धा (प्रकाश कथले): शहरातील ऐतिहासिक ‘पावडे चौक’चे नाव बदलण्याच्या हालचालींवरून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. किमान पाच दशकांहून अधिक काळ या नावाने परिचित असलेल्या या चौकाचा इतिहास स्वातंत्र्यलढा आणि समाजकारणाशी जोडलेला असताना, अचानक नाव बदलण्याचा घाट घातल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

या चौकाला स्वातंत्र्यसेनानी भय्याजी पावडे यांचे स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदान तसेच डॉ. अरुण पावडे यांच्या आरोग्यसेवेतील समृद्ध वारशाचा संदर्भ आहे. पिढ्यानपिढ्या या दोन महनीय व्यक्तींच्या कार्याची साक्ष देणाऱ्या या नावाशी वर्धेकरांचे भावनिक नाते जुळलेले आहे. त्यामुळे ऐतिहासिक ओळख पुसून टाकण्याच्या निर्णयावर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

ज्येष्ठ नेते तथा दिवंगत खासदार दत्ताजी मेघे यांच्या स्मृतींना व कार्याला मान देण्यास आमचा विरोध नाही, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मात्र, त्यासाठी शहरात दुसऱ्या एखाद्या मोठ्या चौकाची निवड करावी, तेथे दत्ताजी मेघे यांचा आकर्षक पूर्णाकृती पुतळा उभारून त्या परिसराचे सुंदर सुशोभीकरण करावे, अशी सुवर्णमध्य काढणारी आग्रही मागणी वर्धेकरांकडून केली जात आहे. प्रशासनाने जनभावनांचा व स्थानिक इतिहासाचा सन्मान करून नामांतराचा निर्णय मागे घ्यावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Share This Article
Exit mobile version