तढेगाव हत्येचा पाच तासांत पर्दाफाश; दीड लाखांच्या सुपारीतून विषारी दारू पाजून खून; उतरादा, इसोलीतील चारही आरोपी जेरबंद!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– अवघ्या पाच तासांत छडा; पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे मारेकरी गजाआड
– लोणारच्या सहलीत घातला होता घाट; दारूच्या बहाण्याने पाजले विष

बुलढाणा/ सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : किनगावराजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात झालेल्या उमेश रमेश परिहार (वय ३८, रा. साकेगाव, ता. चिखली) यांच्या गूढ मृत्यूचा अवघ्या पाच तासांत छडा लावण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जुन्या वादातून दीड लाखांची सुपारी देऊन उमेश यांचा काटा काढण्यात आल्याचे आणि त्यांना विषारी पदार्थमिश्रित दारू पाजल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चारही संशयित आरोपींना तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. किनगावराजा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश परिहार हे ९ सप्टेंबर रोजी आपल्या मुलांना भेटण्यासाठी मडाखेड येथे गेले होते. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी त्यांचे वडील रमेश सांडूसिंग परिहार (वय ६५) यांना उमेश यांचा मृतदेह तढेगाव शिवारातील रस्त्यालगतच्या सोयाबीन शेतात आढळल्याची माहिती मिळाली. मृतकाच्या चेहऱ्यावर सूज, तोंड व नाकातून रक्तस्राव आणि डोक्याला मुका मार लागल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी मृतकाच्या वडिलांनी उतरादा येथील गणेश राजपूतवर संशय व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे समांतर तपास करत प्रकरणाची उकल केली.

पोलिसांच्या तपासानुसार, मृतक उमेश परिहार आणि गणेश मोतीसिंग राजपूत यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून गणेश राजपूत याने सागर प्रकाश पवार याच्यामार्फत नयीमखाँ पठाण आणि गणेश काळे यांना उमेश परिहार यांच्या हत्येसाठी १ लाख ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे उघडकीस आले.

लोणार येथे नेऊन रचला कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी गणेश राजपूत आणि गणेश काळे यांनी उमेश परिहार यांना सोबत घेतले. साखरखेर्डा येथून सागर पवार आणि नयीमखाँ पठाण यांना सोबत घेऊन हे सर्वजण लोणार येथे गेले. तिथे एकत्र जेवण केल्यानंतर उमेश परिहार यांना दारू पाजण्यात आली. याचदरम्यान गणेश काळे याने दारूच्या बाटलीत विषारी पदार्थ मिसळून तो उमेश यांना जबरदस्तीने पाजल्याचा आरोप आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तढेगाव शिवारातील एका सोयाबीन शेतात फेकून देण्यात आला. या प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती विशेष पोलिस वार्तापत्रात देण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये:

  • गणेश मोतीसिंग राजपूत (वय ३९, रा. उतरादा, ता. चिखली)
  • गणेश पुंजाजी काळे (वय ४२, रा. सारस्वती, ता. लोणार)
  • नयीमखाँ उमरखाँ पठाण (वय ५०, रा. ईसोली, ता. चिखली)
  • सागर प्रकाश पवार (वय ५०, रा. उतरादा, ता. चिखली) यांचा समावेश आहे.

पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे, किनगाव राजाचे सपोनि संजय मातोंडकर व त्यांच्या पथकाने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संजय मातोंडकर करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version