-कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचा पुढाकार; आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान, मढी येथे येणाऱ्या भाविकांच्या सुख-सुविधांचा विचार करून देवस्थान ट्रस्टच्या वतीने नवीन प्रवासी बस खरेदी करण्यात आली आहे. भाविक व प्रवाशांच्या वाहतुकीची सुविधा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या बसचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. १२) सकाळी ९ वाजता लोकप्रिय आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी दिली.
शनिवारी लोकार्पण सोहळा
नवीन प्रवासी बसचा लोकार्पण सोहळा शनिवारी, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या शुभहस्ते हा सोहळा होणार असून, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक यावेळी उपस्थित राहणार आहेत. या नवीन बस सुविधेचा लाभ भाविकांनी घ्यावा तसेच लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी केले आहे.
भाविकांच्या सेवेसाठी ट्रस्टचा पुढाकार
देवस्थानकडे येणाऱ्या भाविकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असताना त्यांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने नवीन बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मढी देवस्थानच्या भाविक सेवा व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे.

