‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’मध्ये गणेश मंडळांनी सहभागी व्हावे : तहसीलदार विजय सवडे

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-कला-संस्कृती, सामाजिक कार्य व पर्यावरण संवर्धनासह विविध निकषांवर परीक्षण; तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेचे आयोजन

चिखली (अंकुश पाटील) : राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने विविध स्पर्धा, उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, ही स्पर्धा पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणार आहे.

सदर स्पर्धेसाठी पात्र गणेशोत्सव मंडळांनी ganeshostav.pldmka.co.in या ऑनलाइन पोर्टलवरून विहित मुदतीत अर्ज सादर करावयाचा आहे. परीक्षणासाठी प्रत्यक्ष भेटीसह जीपीएस टॅग असलेली छायाचित्रे व व्हिडिओ रेकॉर्डिंगचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कामगिरीचे मूल्यमापन विविध व्यापक निकषांवर करण्यात येणार असून, एकूण १०० गुणांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

कला व संस्कृतीच्या जतन-संवर्धनाला महत्त्व

कलांचे जतन व संवर्धन या निकषासाठी २० गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये गायन, वादन, नृत्य-नाट्य, दशावतार, पोवाडा, लावणी, झाडीपट्टी, चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला तसेच लुप्त होत असलेल्या कलांच्या संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. संस्कृतीचे जतन व संवर्धन या निकषासाठी २० गुण असून, कवी संमेलन, पुस्तक मेळावे, अभिवाचन, वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धा, पारंपरिक व देशी खेळ, ग्रंथालय आदी उपक्रमांचा विचार केला जाणार आहे. निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे जतन या निकषासाठी २० गुण असून, वने, निसर्ग, गड-किल्ले, राष्ट्रीय व राज्य स्मारकांच्या संवर्धनासाठी जनजागृती व स्वच्छता उपक्रम राबविणाऱ्या मंडळांचा विचार केला जाणार आहे. सामाजिक कार्यासाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटक, दिव्यांग यांच्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आरोग्य, शिक्षण, क्रीडा, कृषी, विज्ञान, समाजसुधारणा आणि अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या जनजागृतीचा समावेश आहे.

गणेशोत्सव आयोजनातील विधायकतेसाठी २० गुण

गणेशोत्सव आयोजनातील विधायकतेसाठी २० गुण देण्यात येणार आहेत. यामध्ये पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, ध्वनी, वायू व जलप्रदूषणमुक्त परिसर, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रथमोपचार आदी भक्तांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा विचार केला जाणार आहे. तसेच ‘एक गाव, एक गणपती’ यांसारख्या विधायक उपक्रमांनाही महत्त्व देण्यात येणार आहे. मंडळाच्या कार्यकारिणीत किमान ३० टक्के महिला प्रतिनिधित्व असणे हा विधायकतेच्या निकषांपैकी एक महत्त्वाचा निकष आहे.

२५० पारितोषिकांसाठी ६२.५० लाख रुपये

तालुक्यांतील प्रथम क्रमांकाच्या मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण २५० पारितोषिके देण्यात येणार असून, एकूण ६२ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. कला व संस्कृतीचे जतन-संवर्धन, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन, सार्वजनिक संपत्तीचे जतन तसेच गणेशोत्सवातील विधायकता या प्रमुख निकषांवर मंडळांचे परीक्षण केले जाणार आहे. पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, स्वच्छता, भक्तांसाठी प्राथमिक सुविधा, महिला सहभाग, सामाजिक उपक्रम आणि महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीचा प्रचार यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या उत्सवाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक महत्त्व जगभरात पोहोचविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ या स्पर्धेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, ती तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येत आहे. तरी चिखली तालुक्यातील सर्व अधिकृत व नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी केले आहे.

Share This Article
Exit mobile version