– संचालक मंडळाची परवानगी नाही, शून्य टक्क्याने कर्जवाटप अन्…; बुलडाणा अर्बनमध्ये कोटींचा आर्थिक गैरव्यवहार!
पुणे (प्रतिनिधी) : बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पुणे विभागात पदाचा गैरवापर करत संचालक मंडळाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप, व्याजमाफी आणि बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. विविध खात्यांमधून परस्पर रक्कम वळवून संस्थेची तब्बल ३४ कोटी ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी बुलडाणा अर्बन सोसायटीचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष दिनकर देशपांडे (वय ६८, रा. लॉ कॉलेज रोड) आणि पुणे विभागाचे विभाग व्यवस्थापक योगिनी योगेश पोकळे (वय ४४, रा. कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
या प्रकरणी बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य लेखापाल मोहन रघुनाथ दलाल (वय ५१, रा. जिजामाता नगर, बुलडाणा) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार, दि. ९ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरनुसार, १ जानेवारी २०१८ ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुणे विभागात हा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. प्रभात रस्त्यावरील यशवंत बिल्डिंगमधील संस्थेच्या कार्यालयात हा गैरव्यवहार घडल्याचे समोर आले आहे.
अशी केली गेली अफरातफर: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पदाचा गैरवापर करून खालीलप्रमाणे गैरव्यवहार केला:
- नियमबाह्य कर्जे मंजूर करणे आणि स्वतःच्या फायद्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज घेणे.
- एका खाजगी कंपनीला बिनव्याजी अॅडव्हान्स देणे आणि ती बँकेची सहायक कंपनी असल्याचे भासवणे.
- संस्थापक अध्यक्षांची बनावट सही करून नवीन सदस्यत्व देणे व ते रद्द करणे.
- खोटे बॅलन्सशीट आरओसीच्या वेबसाईटवर अपलोड करणे.
- संचालक मंडळाच्या परवानगीशिवाय मालमत्ता खरेदी करणे आणि तारण न घेता कर्ज देणे.
- कर्जदारांच्या संमतीशिवाय रक्कम अन्य बँक खात्यांत वळवणे आणि खात्यांमध्ये अफरातफर करणे.
- तारण मालमत्तेच्या विक्रीची रक्कम संस्थेत जमा न करणे.
लेखापरीक्षणात संस्थेची ३४ कोटी ७७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

