-खापरखेड लाड शिवारात धडक कारवाई; ३६ ब्रास रेतीसह तब्बल १ कोटी ९२ लाख १६ हजारांचा मुद्देमाल ताब्यात
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : खापरखेड लाड शिवारात रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा प्रकार महसूल विभागाच्या पथकाच्या कारवाईत समोर आला आहे. बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी महसूल विभागाचे अधिकारी रेती घाटावरील साठ्याची पाहणी करण्यासाठी जात असताना सहा टिप्पर रेती घेऊन जाताना आढळून आले. संबंधितांकडे रेतीची वैध रॉयल्टी अथवा वाहतुकीची परवानगी नसल्याचे चौकशीत आढळल्याचा दावा प्रथम खबर अहवालात करण्यात आला आहे. या कारवाईत सहा टिप्पर आणि त्यामधील एकूण ३६ ब्रास रेती असा तब्बल १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
साठ्याबाबत चालकांकडून महत्त्वाची माहिती
महसूल पथकाने चालकांकडे सदर रेती कुठून भरून आणली, याबाबत विचारणा केली असता संबंधित चालकांनी ‘देवी जुळजाई प्रा. लि.’ यांच्या साठ्यातून रेती भरून आणल्याचे सांगितल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे आता संबंधित रेती साठ्याचा स्रोत, साठवणूक, वाहतूक परवाने आणि रॉयल्टी याबाबतच्या कागदपत्रांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.
एकाच वेळी सहा टिप्पर कारवाईच्या जाळ्यात
महसूल विभागाच्या पथकाला खापरखेड लाड शिवारात सहा टिप्पर आढळून आले. प्रत्येक टिप्परमध्ये सहा ब्रास रेती असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे एकूण ३६ ब्रास रेती जप्त करण्यात आली. खालीलप्रमाणे ही वाहने जप्त करण्यात आली. MH 28 BB 2130 या वाहनात सहा ब्रास रेती असून, तिची किंमत ३६ हजार रुपये व वाहनाची अंदाजे किंमत १५ लाख रुपये नमूद आहे. वाहनमालक म्हणून दिलीप वायाळ आणि चालक म्हणून सोनू सुभाष आडे यांची नावे नमूद आहेत. MH 28 BB 6042 आणि MH 28 BA 6042 या दोन्ही टिप्परमध्ये प्रत्येकी सहा ब्रास रेती असल्याचे नमूद आहे. दोन्ही वाहनांचे मालक रवि बाबुराव जाधव असल्याचे एफआयआरमध्ये नमूद असून, चालकांची नावे उपलब्ध नोंदीत नमूद नाहीत. MH 28 BX 7090 या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळल्याचे नमूद असून, वाहनमालक म्हणून इम्रान शेख यांचे नाव आहे. MH 28 CF 0179 या टिप्परचा मालक अरुण लाड असल्याचे नमूद आहे. या दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी सहा ब्रास रेती असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. MH 28 BB 9925 या टिप्परमध्ये सहा ब्रास रेती आढळली असून, वाहनमालक म्हणून डॉ. केशव अवचार आणि चालक म्हणून पंकज भुजंग भालेराव यांची नावे नमूद आहेत.
अधिकाऱ्यांचे पथक पोहोचताच कारवाई
एफआयआरमधील माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११.४५ वाजता उपविभागीय अधिकारी प्रशांत सानप, तहसीलदार भूषण पाटील, नायब तहसीलदार इप्पर, मंडळ अधिकारी सानप, ग्राम महसूल अधिकारी निलेश जाधव तसेच महसूल सेवक मधुकर मिसाळ व मिलिंद चव्हाण हे शासकीय वाहनाने खापरखेड लाड येथील रेती घाटावरील साठ्याची पाहणी करण्यासाठी जात होते. त्यावेळी सुमारे ११.५५ वाजता हे सहा टिप्पर रेती घेऊन जाताना आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे. पथकाने पंचांसमक्ष सर्व वाहने थांबवून तपासणी केली. रेतीची रॉयल्टी व परवानगीबाबत विचारणा केल्यानंतर संबंधितांकडे वैध कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पंचनामा करून वाहने पोलिसांच्या ताब्यात
कारवाईनंतर महसूल विभागाने सहाही वाहनांचा पंचनामा केला. त्यानंतर जप्त वाहने पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव यांनी बिबी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०३(२) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८(७) व ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता रेतीच्या मूळ साठ्याचीही तपासणी होणार?
सहा टिप्पर एकाच वेळी रेतीसह पकडले गेल्याने या रेतीचा स्रोत, घाटधारकांनी यापूर्वी किती वाहने बिगर रॉयल्टीने नेली आणि किती वाहनांमध्ये यापूर्वी रेती भरून दिली, याची तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी नदीपात्राची मोजणी करणेही गरजेचे आहे. तसेच या साठ्याची वैधता, रॉयल्टी, वाहतूक परवाना आणि संबंधित कागदपत्रांबाबत चौकशी होणे आवश्यक आहे. रेतीचे उत्खनन कोणत्या गटातून करण्यात आले, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे. पुढील तपासात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. महसूल विभागाने केवळ रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांपुरती कारवाई न ठेवता रेतीच्या मूळ साठ्याचीही चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल रेणुका दामोदर पाडघन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तपासातून रेती वाहतुकीमागील संपूर्ण साखळी आणि परवानगीसंबंधीची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

