राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर बैलपोळ्याचा अनोखा सन्मान सोहळा!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-प्रशासनाकडून बैल व शेतकऱ्यांचा गौरव; उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि शेतीच्या परंपरेला बळ देणाऱ्या बैलपोळा सणाचे औचित्य साधून सिंदखेडराजा येथे प्रशासनाच्या वतीने बैल आणि शेतकऱ्यांचा आगळावेगळा सन्मान करण्यात आला. राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक राजवाड्यासमोर पार पडलेल्या या उपक्रमातून ग्रामीण संस्कृती, कृषिपरंपरा आणि शेतकऱ्यांच्या श्रमांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि त्याचा शेतीतील साथीदार असलेल्या बैलांमधील जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करणारा दिवस आहे. वर्षभर शेतकऱ्याच्या शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनात आजही जपली जाते. याच भावनेतून प्रशासनाने यंदा बैल व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या हस्ते बैलांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ऐतिहासिक राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यासमोर झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे पारंपरिक संस्कृतीला आधुनिक प्रशासकीय संवेदनशीलतेची जोड मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शेतकऱ्यांचे जीवन हे शेतीशी आणि शेतीचे नाते पशुधनाशी जोडलेले आहे. आधुनिक यांत्रिकीकरणाच्या काळातही बैलपोळ्याच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राची कृषिपरंपरा आणि पशुधनाविषयीची आत्मीयता जपली जात आहे. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करण्याबरोबरच पारंपरिक सणांचे महत्त्वही अधोरेखित झाले. या प्रसंगी सिंदखेडराजा नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार बडे, ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख, चालक कैलास चव्हाण यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.

कृषिपरंपरेला प्रशासनाची मानवंदना

राजमाता जिजाऊंच्या ऐतिहासिक भूमीत बैलपोळ्यानिमित्त बैल व शेतकऱ्यांचा करण्यात आलेला सन्मान हा ग्रामीण संस्कृती आणि शेतकरी जीवनाचा गौरव करणारा ठरला. प्रशासनाने राबविलेल्या या विधायक उपक्रमाचे उपस्थित नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

Share This Article
Exit mobile version