देऊळगाव माळीतील राऊत कुटुंबीयांची तिसरी पिढी जपतेय ‘इको-फ्रेंडली’ गणेशमूर्तींची परंपरा!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-साच्याशिवाय काळ्या मातीत हाताच्या कौशल्याने साकारताहेत गणेशमूर्ती!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : हल्ली सण-उत्सव साजरे करताना आपण निसर्ग व पर्यावरणाला कुठल्या धोकादायक टप्प्यावर आणून सोडले आहे, याचा अत्यंत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. चोहीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसचा (पीओपी) बेसुमार शिरकाव, थर्मोकोलचा झगमगाट आणि रासायनिक रंगांचा अतिवापर यामुळे नद्या, तलाव आणि विहिरींचा श्वास गुदमरून गेला आहे. अशा प्रदूषणकारी आणि कृत्रिम गर्दीतही निसर्गाचा समतोल राखत मातीशी असलेले आपले पवित्र नाते जपण्याचे धाडस तालुक्यातील देऊळगाव माळी येथील एका निष्ठावंत मूर्तिकार कुटुंबाने दाखवून दिले आहे. ज्येष्ठ मूर्तिकार हरिभाऊ राऊत आणि त्यांच्या परिवारातील तिसरी पिढी आजही कोणतीही रासायनिक भेसळ न करता, तसेच साच्याचा (डायचा) जराही आधार न घेता, केवळ स्वतःच्या हातांच्या कौशल्याने आणि शुद्ध काळ्या मातीने अत्यंत रेखीव व जिवंत गणेशमूर्ती साकारत आहे.

आज बाजारात शाडू किंवा नैसर्गिक मातीच्या मूर्तींऐवजी स्वस्त आणि आकर्षक दिसणाऱ्या पीओपीच्या मूर्तींचा पूर आला आहे. मात्र, ही कृत्रिमता पूर्णपणे नाकारून विसर्जनानंतर निसर्गाच्या कुशीत सहज विलीन होणाऱ्या मूर्ती घडवणे, ही केवळ कला नसून एक मोठे आव्हान आणि सामाजिक उत्तरदायित्वही आहे, ही या कुटुंबाची भावना आहे. राऊत कुटुंबाच्या याच अतुलनीय समर्पणाची आणि पर्यावरणपूरक कार्याची दखल खुद्द राज्य शासनानेही घेतली. तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालयात हरिभाऊ राऊत यांना ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक व मानपत्र देऊन विशेष सन्मानित करण्यात आले होते. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा वा कुटुंबाचा नसून, त्यांनी जपलेल्या पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आणि परंपरेचा गौरव होता. आजघडीला विघटन न होणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या वस्तूंचा त्याग करणे आणि कृत्रिम जलकुंडात विसर्जन करण्याचा पायंडा पाडणे ही काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. निसर्गाचा हा समतोल अबाधित राखण्यासाठी देऊळगाव माळीचे हे राऊत कुटुंब घेत असलेले कष्ट हे केवळ एका सणापुरते मर्यादित नसून, येणाऱ्या भावी पिढ्यांसाठी एक दिशादर्शक वस्तुपाठ ठरत आहेत. स्वर्गीय राजाराम गणपत कुंभार यांच्यापासून सुरू झालेला हा पारंपरिक वारसा पुढे हरिभाऊ राऊत यांचे पुत्र कैलास राऊत तेवढ्याच निष्ठेने व समर्पणाने चालवत आहेत.

आज संपूर्ण जग हवामान बदल आणि वाढत्या प्रदूषणाच्या भयावह संकटाशी झुंजत आहे. अशा गंभीर परिस्थितीत आपण ज्या देवतेचा उत्सव साजरा करतो, त्या देवाची मूर्ती किंवा पूजा साहित्य निसर्गाला घातक ठरणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी. शाडू आणि काळ्या मातीच्या मूर्तींची स्थापना करणे हा केवळ एक पर्याय नसून निसर्गरक्षणाचा दृढ संकल्प आहे. मातीची मूर्ती घडवून निसर्गाचा समतोल राखणे हीच आमची खरी ईश्वरसेवा आहे.

हरिभाऊ राजाराम राऊत (ज्येष्ठ मूर्तिकार, देऊळगाव माळी)

Share This Article
Exit mobile version