-जिल्ह्यातील घरकुल व नरेगाची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; कुचराई किंवा हलगर्जी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे दिशा समितीच्या बैठकीत निर्देश
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : गरिबांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी घरकुल योजनेतील बांधकामाची स्थिती पाहून तात्काळ पैसे अदा करा. जिल्ह्यातील घरकुल व नरेगाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी कालावधी निश्चित करून कुचराई किंवा हलगर्जी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिशा समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिले.
बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज, दि. ९ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना अर्थात घरकुल योजनेच्या स्थितीचा मंत्री महोदयांनी आढावा घेतला. घरकुल योजनेतील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्या. लाभार्थ्यांचे ज्या प्रमाणात काम झाले असेल, त्याच प्रमाणात त्यांना पैशांचे वितरण करा. विहिरींची कामेही त्वरेने पूर्ण करा. गरिबांच्या घरांचे स्वप्न साकार करण्यासाठी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांशी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे व त्यांना त्वरित निधीचे वितरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. घरकुल योजना व नरेगाअंतर्गत लाभार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित न करता संबंधित गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यावरही कारवाई करा. वेळेत संपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर बैठक घेण्याची सूचना यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात यांना देण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, पावसाचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आराखडे तातडीने तयार करावेत. ‘अमृत’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची प्रलंबित कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. कामांमध्ये दिरंगाई अथवा कामचुकारपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे. स्वतंत्र नळ तसेच प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांना मिळत असल्याची खात्री करावी. सुरू असलेल्या कामांना गती देतानाच कामांची गुणवत्ता कायम राखावी, असे त्यांनी सांगितले.
पीक नुकसानीची पाहणी तातडीने करा
पीक नुकसानीची पाहणी तातडीने करून आवश्यक कार्यवाही करावी. ई-पीक पाहणी संबंधित शेतकऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावी. ई-केवायसीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याने संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. कामात विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी. कोणत्याही शेतकऱ्याला अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पावसात झालेल्या विलंबामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक वीज उपलब्ध होईल, याची खात्री करावी. वीज उपलब्धतेअभावी पिकांना पाण्याची कमतरता भासता कामा नये. शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश देताना ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विशिष्ट कंपनीचा अथवा प्रकारचा मोटार पंप खरेदी करण्याची सक्ती करू नये, असे ना. जाधव यांनी स्पष्ट केले. पीएम गतीशक्तीअंतर्गत जिल्ह्यातील जालना-खामगाव नवीन रेल्वे मार्गाशी संबंधित भूसंपादन तसेच इतर सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून विकासकामांना गती द्यावी, असे निर्देश ना. जाधव यांनी दिले. केंद्र शासनाच्या योजनांची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून कामांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी केले.

