-जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पाठिंबा; बोधेगावात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : “गावात राजकीय मतभेद असू द्या; मात्र जनतेच्या विकासाच्या प्रश्नावर एकजूट तुटता कामा नये. जातीभेद विसरा, गावासाठी एकत्र या आणि जायकवाडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे माझा पाठिंबा राहील. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे उभे राहा,” असा थेट आणि आक्रमक संदेश बोधेगाव जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य नितीनराव काकडे यांनी दिला.
नितीनराव काकडे यांना गोपालक व सामाजिक पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल बोधेगाव ग्रामस्थांच्या वतीने मंगळवारी बॅनोमा दर्गा येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना काकडे यांनी गावच्या विकासासह पाणी, गोधन संवर्धन आणि सामाजिक एकोपा याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. “मिळालेला पुरस्कार हा माझा नसून बोधेगावातील प्रत्येकाचा आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. ठरवलेले काम प्रामाणिकपणे केले तर यश निश्चित मिळते,” असे काकडे यांनी सांगितले. गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, “राजकीय मतभेद कायम राहतील; पण गाव एकसंघ राहिले पाहिजे. जातीभेद बाजूला ठेवा. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एका व्यासपीठावर यावे.” गोधन पालनाचे महत्त्व अधोरेखित करत काकडे यांनी गोधनाचा सांभाळ करण्याचे आवाहन केले. बोधेगावात वृद्धाश्रम उभारण्यासाठीही पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘निवडणुकीपुरता पाणीप्रश्न नको!’
“फक्त निवडणूक आली की पाणीप्रश्न हाती घेऊ नये; मात्र जायकवाडी धरणातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी मिळालेच पाहिजे. या मागणीला आमचा जाहीर आणि ठाम पाठिंबा राहील,” असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश्वरचे संचालक रामनाथ राजपुरे यांनीही पाणीप्रश्नावर निर्णायक लढ्याचे संकेत दिले. “राजकारण बाजूला ठेवून पाण्यासाठी एकत्र या. आता प्रामाणिकपणे संघटित लढा उभारण्याची वेळ आली आहे,” असे राजपुरे म्हणाले. परिसरात डोके वर काढणारी गुन्हेगारीही सर्वांनी एकजुटीने मोडून काढण्याचा निर्धार व्यक्त करत राजपुरे यांनी पाणीप्रश्नासाठी सर्वांनी पक्षीय चौकटीच्या बाहेर येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी बोधेगाव येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी ह.भ.प. मच्छिंद्र महाराज पवार, धोंडीराम महाराज घोरतळे, बाबासाहेब तांबे व उगले महाराज यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विठ्ठलराव तांबे, महादेव घोरतळे, गंगाधर घोरतळे, अंकुश घोरपडे, सुनील चव्हाण, दत्तात्रय शिंदे, ज्ञानदेव घोरतळे, केदारेश्वरचे माजी चेअरमन सिताराम हुंडेकरी, विजय कानडे, सुनील जाधव, कासम शेख, अशोक खिळे, हरिश्चंद्र घाडगे, ज्ञानेश्वरचे संचालक रामनाथ राजपुरे, नारायण काशिद, मनोज काशिद, बाळासाहेब काशिद, बाळासाहेब घोरतळे, प्रकाश गर्जे, भागवत शिंगाडे, शिवाजी खेडकर, संतोष वीर, भगवान मिसाळ, सदा गायकवाड, प्रभाकर घोरतळे, एकनाथ घोरतळे, दत्तू तहकीक, उद्धव वाघ, दीपक गायकवाड, बाळासाहेब उबाळे, दत्तू शिंदे, सुभाष अकोलकर, उपसरपंच संग्राम काकडे, माजी सरपंच सुभाष पवळे, बप्पा मस्के, लिंबाजी माळी यांच्यासह बोधेगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत घोरपडे व मच्छिंद्र घोरतळे यांनी केले.
छायाचित्र ओळ :
बोधेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्यांना गोपालक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रामनाथ राजपुरे, कासम भाई शेख, अशोक खिळे आदी ग्रामस्थ दिसत आहेत.
छायाचित्र : बाळासाहेब खेडकर

