-वडार समाज गोविंदा पथकाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे प्रथम पारितोषिक — ‘धप्पा’ चित्रपटातील कलाकारांचा विशेष सन्मान
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शहरातील खंडोबा मैदानावर रंगलेल्या ‘नगराध्यक्ष भव्य दहीहंडी उत्सव सोहळा २०२६’ मध्ये गोविंदा पथकांच्या थरारक चढाओढीने शेवगावकरांचा उत्साह अक्षरशः शिगेला पोहोचला. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपानजी भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात हजारो नागरिकांनी गर्दी करत दहीहंडीचा जल्लोष अनुभवला.
दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत वडार समाज गोविंदा पथकाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या पथकाला तब्बल १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सहभागी पथकांपैकी पाच पथकांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक व ट्रॉफी देण्यात आली. या सोहळ्यास शिवसेना नेते अरुणभाऊ मुंढे, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. माया अरुण मुंढे यांच्यासह ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे, पैठण नगराध्यक्ष भूषणजी कावसानकर, दूध महासंघाचे चेअरमन नंदूअण्णा काळे, व्हाईस चेअरमन नंदू काका पठाडे, पंचायत समिती सदस्य डॉ. भारतजी झारगड, नाथ मंदिर विश्वस्त दादा पा. बारे, प्रगतशील शेतकरी निवृत्ती मापारी, गहिनीनाथ दादा शिरसाठ, संजयभाऊ कीर्तने, अर्जुन धायतडक, कृष्णा धायतडक, ॲड. भाऊसाहेब सानप, अमोलभाऊ सागडे, प्रेमभाऊ जाजू, राजूभाऊ तरटे, नगरसेवक नंदकुमार मुंढे, दिगंबर तात्या काथवटे, अंकुश कुसळकर, एकनाथ कुसळकर, ॲड. शामभाऊ कंनगरे, उदय गांगुर्डे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
‘धप्पा’च्या कलाकारांचा गौरव
दरम्यान, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेल्या ‘धप्पा’ चित्रपटातील कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नृत्यांगना स्नेहा पिंपरीकर यांचाही विशेष गौरव करण्यात आला. दहीहंडी सोहळ्याला शहरातील नागरिक, माता-भगिनी, युवक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा उत्साह आणि नागरिकांच्या जल्लोषामुळे खंडोबा मैदानाला जणू उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शिवसेना नेते अरुणभाऊ मुंढे मित्र मंडळ, वंदे मातरम् ग्रुप आणि दहीहंडी उत्सव समिती, शेवगाव शहर यांच्या वतीने या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले. शेवगावच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा देणारा, युवकांच्या उत्साहाला नवी ऊर्जा देणारा आणि शहराच्या एकजुटीचे दर्शन घडविणारा हा दहीहंडी सोहळा ठरला.

