सहकारातील ‘किंग इज बॅक’!; बुलढाणा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– बुलढाणा जिल्हा बँकेत ‘घाटावर-घाटाखाली’चा राजकीय समतोल; डॉ. राजेंद्र शिंगणे अध्यक्ष तर गोविंद मिरगे उपाध्यक्षपदी बिनविरोध
– ‘अर्बन रेसिडेन्सी’तील वाटाघाटी यशस्वी; महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांची सहकारात पडद्यामागून दिलजमाई!
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चा दावा तंतोतंत खरा; पक्षाच्या भिंती बाजूला सारत जिल्हा बँकेत नवे राजकीय समीकरण!

बुलढाणा (बाळू वानखेडे) : बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची, तर उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे गोविंद मिरगे यांची आज बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, आजच्या अधिकृत घोषणेने डॉ. शिंगणे यांनी सहकार क्षेत्रातील आणि पर्यायाने बँकेवरील आपली मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने कालच या सत्तासमीकरणांबाबत दिलेले वृत्त या निमित्ताने तंतोतंत खरे ठरले आहे.

जिल्हा बँकेच्या सभागृहात आज सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे आणि उपाध्यक्षपदासाठी गोविंद मिरगे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला. परिणामी, कोणतीही निवडणूक न होता या दोन्ही नेत्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी तब्बल १९ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला होता. या एकतर्फी विजयामुळेच अध्यक्षपदाची धुरा डॉ. शिंगणे यांच्याकडेच जाणार, यावर आधीच शिक्कामोर्तब झाले होते.

या निवडीत राजकीय आणि भौगोलिक समीकरणांचा अत्यंत कल्पकतेने मेळ घातल्याचे स्पष्ट होते. अध्यक्षपद ‘घाटावर’ (डॉ. शिंगणे) तर उपाध्यक्षपद ‘घाटाखाली’ (गोविंद मिरगे) देऊन जिल्ह्यात प्रादेशिक समतोल साधण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रवादी (शरद पवार गट) विरुद्ध भाजप किंवा महाविकास आघाडी आणि महायुती अशा परस्परविरोधी राजकीय विचारधारा बाजूला ठेवून सहकारात सामायिक सत्तासमीकरणे जुळवून आणण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेची आणि वाटाघाटींची रूपरेषा कालच बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर झालेल्या बैठकीत यशस्वीरीत्या निश्चित करण्यात आली होती.

सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, प्रशासकीय कौशल्य आणि संचालक मंडळावरील एकहाती वर्चस्वाच्या जोरावर डॉ. शिंगणे यांनी पुन्हा एकदा बँकेचे नेतृत्व स्वीकारले आहे. निवडीची अधिकृत घोषणा होताच बँक परिसरात उपस्थित समर्थकांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. सध्या सोशल मीडियावर ‘किंग इज बॅक’ अशा आशयाचे पोस्टर्स तुफान व्हायरल होत असून, संपूर्ण जिल्ह्यातून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. राजेंद्र शिंगणेंच्याच गळ्यात पडणार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ; ‘सहकार’मध्ये हालचालींना वेग!

Share This Article
Exit mobile version