मेहकर, सिंदखेडराजा तालुक्यातील पेट्रोल पंपांवर अन्न व पुरवठा विभागाची कारवाई

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-राज्यस्तरीय दक्षता पथकाचा सर्जिकल स्ट्राईक; अवैध बायोडिझेल साठ्यासह तब्बल २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध बायोडिझेल साठ्यावर कारवाई करत तब्बल २१ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई दुसरबीड आणि मेहकर येथील पेट्रोल पंपांवर करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध बायोडिझेल वापराचा पर्दाफाश केला आहे.

मेहकर येथील वृंदावन लॉन्सजवळ, हॉटेल बंजारासमोर, छत्रपती शिवाजी महाराज बायपास रोडवरील मोकळ्या जागेत तसेच दुसरबीड गावातील हॉटेल गावकरी फॅमिली रेस्टॉरंटसमोर, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे सुरू असलेल्या अवैध बायोडिझेल पंपांवर धडक छापे टाकण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये २१ लाख ६९ हजार रुपये किमतीचा एक मालमोटार ट्रक तसेच बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने घटनास्थळावरून अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, भूमिगत लोखंडी टाक्या, डिस्पेन्सर युनिट, डिझेल साठा, पाइप व इतर मुद्देमाल जप्त केला. जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून, पुढील तपास पोलिस अधिकारी करीत आहेत. सदर बायोडिझेलसदृश पेट्रोलियम द्रव पदार्थाचा अवैध साठा नेमका कोठून आणण्यात आला होता, याचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्थानिक पोलिस आणि पुरवठा विभागाचे पथक पुढील तपास जलद गतीने करीत आहे.

या कारवाईत राज्य दक्षता पथकातील उपनियंत्रक शिधावाटप अंमलबजावणी गणेश बेल्लाळे, सहायक नियंत्रक शिधावाटप प्रदीप काळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे तसेच शिधावाटप निरीक्षक राजेश सोरते, अरुण काते, विकास नागदिवे, पवन कुंभले, रविंद्र राठोड, राजीव भेले, देवानंद थोरवे, रामराजे भोसले, दिपेंद्र परूळेकर, अमोल बुरटे, चंद्रकांत कांबळे, राहूल इंगळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नहुशकुमार बोरोडे, शुभम फाले, पुरवठा निरीक्षक विवेक जगताप, सुनील झाल्टे आणि गोदाम लिपिक विशाल लोखंडे सहभागी होते. अशा प्रकारच्या अवैध इंधन आणि गॅस तस्करांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा चंद्रकांत डांगे (भा.प्र.से.) यांनी दिला आहे.

Share This Article
Exit mobile version