राधेश्याम बंगाळे यांना नॅशनल आयकॉन २०२६ पुरस्काराने सन्मानित

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शिक्षक दिनानिमित्त आयोजित नॅशनल आयकॉन अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : नशामुक्ती केंद्राचे संचालक राधेश्याम बंगाळे यांना यावर्षीचा अत्यंत मानाचा ‘नॅशनल आयकॉन २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या वतीने शिक्षक दिन तसेच दैनिक समीकरणच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२६’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत उत्साही आणि भावूक वातावरणात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण सभापती अशांतभाई वानखेडे होते. प्रमुख अतिथी म्हणून धनश्रीताई काटीकर पाटील, हिंदी-मराठी पत्रकार संघ महाराष्ट्राच्या अध्यक्षा, तसेच प्रा. अनिल खर्चे, प्राचार्य, व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालय उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना शिक्षण सभापती अशांतभाई वानखेडे म्हणाले, “शिक्षक हे समाजाचा कणा असतात. ते केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देऊन एक सुजाण नागरिक घडवतात.” विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणसिंग सिरसवाल यांनी केले, तर सूत्रसंचालन अनिल केसकर सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version