डॉ. राजेंद्र शिंगणेंच्याच गळ्यात पडणार जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ; ‘सहकार’मध्ये हालचालींना वेग!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– बुलढाणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष उद्या ठरणार; सहकार पॅनलचे स्पष्ट बहुमत!
– नवीन संचालकांच्या स्वागतासाठी बँकेची मुख्य इमारत नव्या नवरीसारखी सजली!

बुलढाणा (बाळू वानखेडे): मागील १८ वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची धुरा अखेर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या हाती जाणार आहे. बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (९ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता बँकेच्या सभागृहात पार पडणार आहे. या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संचालकांवरील पकड आणि प्रशासकीय कौशल्याचा विचार करता, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे आहे.

नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १९ जागांवर दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे अध्यक्षपद सहकार पॅनलकडेच राहणे निश्चित मानले जात आहे. ऐनवेळी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यासच वेगळा चेहरा समोर येईल; अन्यथा डॉ. शिंगणे यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडेल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्रदीर्घ काळानंतर लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या या संचालक मंडळाच्या स्वागतासाठी जिल्हा बँकेची मुख्य इमारत नव्या नवरीसारखी सजवण्यात आली आहे. इमारतीची आतून व बाहेरून आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

मागील १८ वर्षे बँक प्रशासकाच्या ताब्यात होती. रिझर्व्ह बँकेचे कडक निर्बंध आणि आर्थिक अडचणींमुळे बँकेची स्थिती बिकट झाली होती. या काळात प्रशासकीय अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या. आता नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळासमोर बँकेचा हा आर्थिक गाडा अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचे मोठे आव्हान असणार आहे. बुधवारी होणाऱ्या विशेष सभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असून, या बहुप्रतिक्षित निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


तब्बल १८ वर्षांनंतर बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक पार पडली. एकूण २१ संचालक पदांसाठी झालेल्या या राजकीय रणसंग्रामात १२ जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ जागांवर झालेल्या प्रत्यक्ष मतदानात ‘छत्री’ या चिन्हावर लढणाऱ्या सहकार पॅनलने तब्बल ७ जागांवर विजय मिळवला, तर ‘ट्रॅक्टर’ चिन्ह घेऊन मैदानात उतरलेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर मतदारांनी मोहर उमटवली आहे. दुसरीकडे, बँक पुनरुज्जीवनाचा मुद्दा उपस्थित करून राजकीय गणिते बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना मात्र मोठा धक्का बसला आहे.


सहकार पॅनलच्या विजयी झालेल्या सात उमेदवारांमध्ये सुनील राजाराम उदयकर, गोविंदराव गणपत मिरगे, श्रीकांत दादाराव मारोडे, पुष्पाबाई बारवकर, अस्मिता प्रदीप हेलगे, संजय भास्करराव रायमुलकर व गोविंद शेषराव मापारी यांचा समावेश आहे. तर शेतकरी परिवर्तन पॅनलचे ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे हे दोन उमेदवार विजयी झाले. ‘स्वर्गीय अजित पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’च्या माध्यमातून प्रस्थापित सहकार पॅनलला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जिल्हा बँकेला स्व. अजितदादा पवार यांनी पुनरुज्जीवन दिल्याचा मुद्दा पुढे करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनी या निवडणुकीत वेगळे राजकीय समीकरण उभे करण्याचा प्रयत्न केला होता.

Share This Article
Exit mobile version