डीजे, लेझरला फाटा; नियम तोडाल तर कारवाई अटळ!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक मम्मूका सुदर्शन यांचे आवाहन; शेवगावात शांतता समितीची बैठक

शेवगाव (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण, लेझरचा अतिवापर, रस्त्यांवरील अतिक्रमण आणि नियमबाह्य मिरवणुका खपवून घेतल्या जाणार नाहीत. गणेश मंडळांनी डीजे व लेझरला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. कायदा व न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक मम्मूका सुदर्शन यांनी दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयाच्या आवारात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी पोलिस, महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन विभाग, महावितरण यांसह विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, गणेश मंडळांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

डीजेच्या दणदणाटाला लगाम

गणेशोत्सव हा धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक सलोखा आणि संस्कृती जपणारा उत्सव आहे. मात्र, उत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास देणे, ध्वनिप्रदूषण करणे अथवा लेझर लाईटचा गैरवापर करणे योग्य नाही. त्यामुळे मंडळांनी डीजेऐवजी ढोल, ताशा, लेझीम, हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन सुदर्शन यांनी केले. ‘उत्सव साजरा करा; पण नियमांच्या चौकटीतच!’ असा स्पष्ट संदेश देत त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.

‘एक गाव, एक गणपती’चा विचार करा

गणेशोत्सवात मंडळांनी अनावश्यक खर्च आणि दिखाव्याला फाटा द्यावा. शक्य असेल तेथे ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेचा विचार करावा. उत्सवावरील खर्चात बचत करून त्यातून गरजू कुटुंबांना मदत, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पाणी बचत, स्वच्छता मोहीम, व्यसनमुक्ती अभियान यांसारखे सामाजिक उपक्रम राबवावेत, असेही सुदर्शन यांनी सांगितले. नव्या पिढीला आपल्या पारंपरिक संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी पारंपरिक वाद्यांचे प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

रस्ते अडवून मंडप उभारू नका

गणेश मंडळांनी सार्वजनिक रस्ते अथवा इतर ठिकाणी अतिक्रमण करून मंडप उभारू नयेत. मंडप उभारणीपूर्वी संबंधित विभागांची परवानगी घ्यावी. मिरवणुकीचे मार्ग, ध्वनीक्षेपक, विद्युत व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि अग्निसुरक्षेबाबत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. उत्सवाच्या काळात किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊ नये, यासाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी. सोशल मीडियावरून अफवा, आक्षेपार्ह पोस्ट अथवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित करू नयेत, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा

गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. गैरवर्तन, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे अथवा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सुदर्शन यांनी दिला. गणेशोत्सव आनंदाचा असावा; कोणाच्याही त्रासाचे कारण बनू नये. नागरिक, गणेश मंडळे आणि प्रशासनाने परस्पर सहकार्याने उत्सव शांततेत पार पाडावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

यावेळी पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू, शेवगाव पोलिस निरीक्षक मोहन बोरसे, तहसीलदार आकाश दहाडे, वन विभागाचे आजिनाथ घनवट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रल्हाद पाठक, महावितरणचे विश्वास नरके आदी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी केले. बैठकीत शिवसेना नेते अरुण मुंडे, दत्तू फुंदे, नीरज लांडे, मीना कुळकर्णे, डॉ. मेधा कांबळे, अशोक ढाकणे, बाळासाहेब विघ्ने आदींनी विविध सूचना मांडल्या. गणेशोत्सव हा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे डीजेचा दणदणाट, लेझरचा झगमगाट आणि नियमबाह्य प्रकार टाळून पारंपरिक व संस्कृतीप्रधान गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मम्मूका सुदर्शन यांनी केले.

फोटो ओळ : शेवगाव येथे गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हा पोलिस अधीक्षक मम्मूका सुदर्शन. व्यासपीठावर अरुण मुंडे, तहसीलदार आकाश दहाडे, पोलिस उपअधीक्षक नीरज राजगुरू आदी. (छाया : बाळासाहेब खेडकर)

Share This Article
Exit mobile version