पांगरी काटे येथे सौरऊर्जा वायरपाठोपाठ विद्युत तारांची चोरी; शेतकरी अंधारात, महावितरणचे दुर्लक्ष

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सौरऊर्जा केबल, स्प्रिंकलरच्या तोट्यांनंतर आता मेन लाईनवरील ताराही चोरट्यांनी नेल्या; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी काटे येथे शेतातील विद्युत तारा चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. या अगोदर सौरऊर्जा वायर तसेच स्प्रिंकलरच्या तोट्या चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता चक्क मेन लाईनवरील ताराही चोरून नेण्यात आल्या आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.

दादाराव हिवाळे यांच्या शेतातील रोहित्रापासून (डीपी) शेतापर्यंत जाणाऱ्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. पांगरी काटे शिवारातील शेतात असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून रात्रीच्या अंधारात तारा कापून चोरी करण्यात आली आहे. या चोरीमुळे शेतातील मोटारपंप बंद पडले असून, उभ्या पिकांना पाणी देता येत नाही. ऐन पावसाच्या खंडाच्या काळात ही चोरी झाल्याने पिके करपण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. रोहित्राखालील फ्युज बॉक्सही फोडण्यात आला असून, आतील साहित्याचीही नासधूस करण्यात आली आहे.

चार-पाच दिवसांपूर्वी येथील सात शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरच्या तोट्या चोरून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर लगेचच ही चोरी झाल्याने या भागात चोरट्यांची दहशत वाढली आहे. शेतातील सौरऊर्जा प्रकल्पावरील केबल वायर, स्प्रिंकलरच्या तोट्या तसेच विद्युत तारा तोडून नेण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. अगोदरच पाऊस पडत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यात अशा चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेबाबत महावितरण तसेच साखरखेर्डा पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागलेला नाही. वाढत्या विद्युत साहित्य चोरीच्या घटनांमुळे पांगरी काटे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, गस्त वाढवण्याची तसेच चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Share This Article
Exit mobile version