आळंदीत श्रावणी सोमवारदिनी सिद्धेश्वरांना अभिषेक बंद; भाविकांत नाराजी

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-परिसरातील शिवमंदिरांत धार्मिक उपक्रम; भाविकांनी घेतले अभिषेक व दर्शन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्रीक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरातील पुरातन श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असताना, केवळ एकादशीचे कारण पुढे करून आळंदी देवस्थानने परस्पर अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे अनेक भाविकांना श्रावणातील सोमवारी केला जाणारा अभिषेक सेवेला मुकावे लागले असून, अनेक भाविकांच्या धार्मिक सेवेत खंड पडल्याचे उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी सांगितले.

या प्रकारामुळे अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त करीत देवस्थानच्या कारभारावर ताशेरे ओढले. मात्र, आळंदी परिसरातील अनेक शिवमंदिरांत भाविकांनी गर्दी करून अभिषेक, पूजा करून दर्शन घेतले. पुरातन श्री सिद्धेश्वर मंदिरात आळंदी देवस्थानच्या वतीने अभिषेक करण्यात आला. परिसरातील शिवभक्तांनी श्रावणी सोमवार व अजा एकादशीदिनी उपवास करून एकादशीही साजरी केली. आळंदीसह परिसरातील पुरातन, पांडवकालीन शिवमंदिरांतही भाविकांची श्रींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती. भाविकांनी रांगा लावत श्रींचे दर्शन व महाप्रसाद घेतला. आळंदीतील इंद्रायणी नदीकाठावरील श्री वैतागेश्वर महाराज मंदिरात लहानग्यांसह भाविकांनी दर्शन घेत स्थानमहात्म्याची परंपरा जोपासली. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील प्रथा-परंपरांचे पालन करीत श्रावणातील शेवटच्या सोमवारी श्रींना अभिषेक पूजा करण्यात आली. आळंदी परिसरातील विविध गावांतील मंदिर व्यवस्थापकांनीही मंदिरांत श्रींचा अभिषेक केला. मंदिर परिसरात चहुबाजूंनी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती. मात्र, श्री सिद्धेश्वर महाराजांच्या पुरातन मंदिरात यावर्षी अभिषेक बंद असल्याने शिवभक्तांना श्रींचे दर्शन व अभिषेक करता आला नाही. आळंदी पंचक्रोशीतील शिवमंदिरांतही श्रींच्या दर्शनासह अभिषेकासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यात इंद्रायणी नदीकाठावरील श्री वैतागेश्वर मंदिर, पांडवकालीन वडगाव येथील श्री बेली महादेव मंदिर आदी मंदिरांचा समावेश होता.

आळंदीत सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक बंद; भाविकांत नाराजी

ऐन श्रावणातील सोमवारी श्री सिद्धेश्वर मंदिरातील अभिषेक बंद ठेवण्यात आला. यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली. केवळ एकादशी असल्याचे कारण पुढे करून देवस्थानने नियोजन जमत नसल्याचे उघड केले, असा आरोप भाविकांनी केला. “भाविकांची गर्दी असते म्हणून नियोजन करायचेच नाही का?” असा सवाल भाविकांनी उपस्थित केला. उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनीही नाराजी व्यक्त करीत अभिषेक सेवेत खंड पडल्याने देवस्थान याची काय जबाबदारी घेणार, असा सवाल केला. अजा एकादशीदिनी कार्तिकी व आषाढी यात्रेपेक्षा गर्दी जास्त नसते. फारशी गर्दी नसतानाही प्रभावी नियोजन न केल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त करीत टीका केली. दर्शन व अभिषेक व्यवस्थेचे नियोजन न करता धार्मिक उपक्रम बंद करून भाविकांच्या भावना दुखावल्याप्रकरणी देवस्थानच्या विश्वस्तांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाविकांनी केली.

इतर मंदिरांत अभिषेकाची संधी; आळंदीत मात्र गैरसोय

इतर मंदिरांत आवाहन करून भाविकांना अभिषेक करण्यासाठी संधी दिली जाते. आळंदीत मात्र अभिषेक बंद ठेवून भाविकांची गैरसोय करण्यात आली आणि धार्मिक सेवेत खंड निर्माण केला, अशी भावना व्यक्त करण्यात आली. आळंदी परिसरातील भाविक आणि काही ग्रामस्थांचे बारा महिने दर सोमवारी अभिषेक असतात. देवस्थानच्या या निर्णयामुळे त्यांच्या नित्य अभिषेक सेवेत व धार्मिक उपचारात खंड पडला असून, याला जबाबदार कोण? त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, याचे देवस्थानच्या विश्वस्तांना काही वाटते की नाही, असा संतप्त सवाल उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी व्यक्त केला. भाविक व नागरिकांच्या वतीने त्यांनी आपल्या भावना मांडल्या. आळंदीत अभिषेक बंद ठेवून भाविकांची गैरसोय करण्यात आली. मंदिरात सहज, सुलभ, सुखकर आणि समाधानकारक दर्शनही सध्या मिळत नसल्याची तक्रार भाविकांनी केली. दर्शनबारी मोकळी असतानाही येरझाऱ्या मारत दर्शनबारीतून जावे लागते. थेट आणि कमी वेळेत दर्शन होणे आवश्यक असताना नियोजनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगण्यात आले. आळंदी ग्रामस्थांसाठी ठराविक वेळेत स्वतंत्र दरवाजातून दर्शनाची व्यवस्था करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी उद्योजक सचिनशेठ येळवंडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

अजा एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

अजा एकादशीनिमित्त मंदिरात परंपरेनुसार विविध धार्मिक कार्यक्रम व उपवासाचा महानैवेद्य करण्यात आला. श्रींच्या गाभाऱ्यात लक्षवेधी पुष्पसजावट करण्यात आली होती. प्रथा-परंपरांचे पालन करीत मंदिरात एकादशी साजरी करण्यात आली. इंद्रायणी नदीघाटावर देवस्थानच्या वतीने इंद्रायणी आरतीचा कार्यक्रम उत्साहात झाला. आळंदी नगरपरिषदेतर्फे इंद्रायणी नदीघाटावर स्वच्छता अभियानही राबविण्यात आले.

Share This Article
Exit mobile version