-सर्वपक्षीय कृती समितीची कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; अन्यथा व्यापक जनआंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (बाळासाहेब खेडकर) : जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी शेवगाव तालुक्याने केलेल्या त्यागाची योग्य भरपाई म्हणून तालुक्याच्या हक्काचे पाणी पूर्व भागातील दुष्काळी गावांना मिळावे, या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १ साठी राखीव असलेल्या शिल्लक पाण्यातून शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील २८ गावांमधील तलाव, बंधारे, नालाबंडिंग व पाणलोट क्षेत्र वर्षातून चार वेळा भरून देण्यात यावे. ही मागणी पूर्ण केल्याशिवाय ताजनापूर लिफ्टचे शिल्लक पाणी अन्य कोणत्याही तालुक्यासाठी देऊ नये, अशी ठाम भूमिका ताजनापूर लिफ्ट सर्वपक्षीय कृती समितीने घेतली आहे.
जायकवाडीच्या निर्मितीसाठी २९ गावांचा त्याग
निवेदनात म्हटले आहे की, जायकवाडी धरणाच्या निर्मितीपूर्वी शेवगाव तालुक्याच्या उत्तरेकडील गोदावरी नदीलगत २९ गावे व मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन होती. जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी ही गावे व जमीन शासनाने संपादित केली. धरणाचे भूमिपूजन १८ ऑक्टोबर १९६५ रोजी झाले. या २९ गावांच्या विस्थापनाच्या पार्श्वभूमीवर शेवगाव तालुक्यातील शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी ॲड. आबासाहेब काकडे यांच्या नेतृत्वाखाली १९६५ ते १९७८ या कालावधीत सातत्याने संघर्ष केला. या लढ्यात अनेक कार्यकर्ते व शेतकऱ्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. या संघर्षातून शेवगाव तालुक्यासाठी जायकवाडी धरणात ३.८ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आल्याचा दावा कृती समितीने केला आहे.
ताजनापूर लिफ्टचे दोन टप्पे
शेवगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी ताजनापूर गावापासून पाणी उचलण्याची योजना आखण्यात आली. या योजनेचे टप्पा क्र. १ आणि टप्पा क्र. २ असे विभाजन करण्यात आले. टप्पा क्र. १ साठी १.६१ टीएमसी अर्थात ४३ दशलक्ष घनमीटर, तर टप्पा क्र. २ साठी २.२६७ टीएमसी अर्थात ६४.२० दशलक्ष घनमीटर पाणी राखीव असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सन १९९९ पासून ॲड. शिवाजीराव काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला हे पाणी मिळावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या संघर्षानंतर एप्रिल २००७ मध्ये २८ गावांच्या सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाने ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. २ मध्ये केवळ १७ गावांचा समावेश केल्याने उर्वरित गावांचा पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
टप्पा-१चे पाणी शिल्लक असल्याचा दावा
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १ साठी राखीव असलेल्या पाण्यापैकी प्रत्यक्ष वाटपानंतरही काही पाणी शिल्लक राहत असल्याचे कृती समितीने म्हटले आहे. जलसंपदा विभागाने ‘वाल्मी’, छत्रपती संभाजीनगर या संस्थेमार्फत या योजनेचा तांत्रिक अभ्यास व अहवाल तयार केल्याची माहिती समितीला मिळाली आहे. या तांत्रिक अभ्यासानुसार उपलब्ध पाण्यातून प्रत्यक्ष पाणीवाटप केल्यानंतरही शिल्लक पाण्याचा उपयोग शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी गावांसाठी करता येऊ शकतो, असा समितीचा दावा आहे. त्यामुळे हे पाणी अन्यत्र वळविण्याऐवजी शेवगावच्या २८ गावांमधील जलसाठे भरण्यासाठी वापरावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
२८ गावांच्या जलसाठ्यांना पाणी देण्याची मागणी
चेडेचांदगाव, बेलगाव, लाडजळगाव, अंतरवाली बु., अंतरवाली खु., शिंगोरी, राणेगाव, कोनोशी, शोभानगर, आधोडी, दिवटे, गोळेगाव, नागलवाडी, शेकटे खु., सुकळी, सुळे पिंपळगाव, बाडगव्हाण, मुरमी, लमानतांडा, बालमटाकळी, गायकवाड जळगाव, ठाकूरपिंपळगाव, बोधेगाव, सोनविहीर, लखमापुरी, कांबी आणि हातगाव आदी २८ गावांतील तलाव, बंधारे, नालाबंडिंग तसेच पाणलोट क्षेत्र भरून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागातील बहुतांश जमीन खडकाळ व डोंगराळ आहे. पावसाचे प्रमाणही कमी असल्याने शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे. या परिसरातील शेतकरी, ऊसतोडणी कामगार, भूमिहीन व अल्पभूधारक कुटुंबांना पाण्याच्या उपलब्धतेअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हक्काचे पाणी उपलब्ध झाल्यास शेती उत्पादन वाढण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
२०२० पासून पाठपुरावा; आता निर्णायक लढ्याची तयारी
ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १च्या शिल्लक पाण्याचा उपयोग दुष्काळी गावांसाठी करण्यात यावा, या मागणीसाठी २०२० पासून संबंधित गावांतील शेतकरी व नागरिक सातत्याने आंदोलने, निवेदने आणि प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करीत आहेत. शासनस्तरावर या मागणीसंदर्भात सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असतानाही प्रत्यक्ष पाणी उपलब्ध झालेले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. आता २८ गावांच्या सर्वपक्षीय कृती समितीने या प्रश्नावर निर्णायक लढा देण्याची भूमिका घेतली आहे. “शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील २८ गावांचे तलाव, बंधारे व नालाबंडिंग भरून दिल्याशिवाय ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १चे शिल्लक पाणी अन्य तालुक्याला देऊ नये. तसे झाल्यास शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल आणि तीव्र जनक्षोभ निर्माण होईल,” असा इशारा समितीने दिला आहे.
पालकमंत्र्यांची भेट घेणार
कार्यकारी अभियंता व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आता कृती समितीचे शिष्टमंडळ लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेणार आहे. ताजनापूर लिफ्ट टप्पा क्र. १च्या शिल्लक पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा आणि २८ गावांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, यासाठी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. “आंदोलनाची वेळ येण्यापूर्वी शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून शेवगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. जायकवाडी धरणासाठी शेवगावने केलेल्या त्यागाचा न्याय्य मोबदला म्हणून हक्काचे पाणी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील,” अशी भूमिका सर्वपक्षीय कृती समितीने स्पष्ट केली. या निवेदनावर जि.प. सदस्या हर्षदा काकडे, अमरनाथ बरडे, माणिक गर्जे, गहिनीनाथ बोडखे, संदीप काकडे, ॲड. संजय काकडे, शिवाजी कणसे, राम गरगडे, हरी फाटे, हरिभाऊ केसभट, रामराव चेमटे, नितीन खेडकर, सर्जेराव घोरपडे, भास्कर मासाळ, सुनील गायके, जिजा गरड, विशाल बडे, सुरेश सांगळे, दीपक गोरे, विठ्ठल गायकवाड, परमेश्वर पवार, नवनाथ रासनकर, अनिस सय्यद, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब केदार, परमेश्वर चेडे, बाबासाहेब म्हस्के, बाबासाहेब कसाळ, तुकाराम पठाडे, सचिन पालवे, कुंडलिक काकडे, भागवत शिंगाडे, कचरू उदे, सोन्याबापू परांडे, भास्कर मासाळकर, अंबादास गोयकर यांच्यासह शेतकरी व कृती समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.

