– सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे!
– शंतनू बोंद्रे यांच्या पाठपुराव्याला यश; अतिरिक्त ८४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार!
चिखली/ देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : बुलढाणा जिल्ह्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाच्या जलप्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत खडकपूर्णा प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजनेत अंचरवाडी (तलाव क्र. १) व मिसाळवाडी लघुतलावाचा समावेश करण्यासाठी जलसंपदा विभागाने तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत.
सुमारे ४० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अंचरवाडी (तलाव क्र. १ व २) आणि मिसाळवाडी लघुतलावांच्या कालव्यांची सध्या मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे एकूण १,७९७ हेक्टर लाभक्षेत्रापैकी केवळ ९५३ हेक्टर क्षेत्रावरच प्रत्यक्षात सिंचन होत आहे. हे तलाव खडकपूर्णा प्रकल्पाच्या टप्पा क्र. ३ च्या लाभक्षेत्रात समाविष्ट (डिनोटिफाय) केल्यास उपलब्ध ३० दलघमी पाण्याचा योग्य वापर होऊन अतिरिक्त ८४४ हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणे शक्य होणार आहे.
येळगाव जलाशयाची क्षमता वाढवणार
बुलढाणा शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येळगाव जलाशयाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. याशिवाय, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून जिल्ह्यातील वंचित भागांना सिंचन, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याच्या तांत्रिक शक्यता तपासण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.
“जत (सांगली) धर्तीवर बुलढाणा जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी विशेष विकास आराखड्यानुसार सूक्ष्म नियोजन केले जात आहे. या लघुतलावांच्या समावेशामुळे स्थानिक भूजल पातळी वाढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.”
— मकरंद पाटील, पालकमंत्री, बुलढाणा

