– काँग्रेस नेत्याच्या सहकार्याने ‘धर्मवीर’चा महोत्सव?; विरोधकाचा फोटो झळकल्याने स्थानिक प्रभावावर प्रश्नचिन्ह!
धाड/चिखली (राजेंद्र घुबे) – बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या ‘धर्मवीर फाउंडेशन’च्यावतीने धाड गावात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाने सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे. एरवी स्वतःच्या कार्यकर्त्यांना ‘आग्या मोहळ’ म्हणत राजकीय विरोधकांना अंगावर घेणारे संजुभाऊ आता गर्दी जमवण्यासाठी चक्क दुसऱ्याच्या दारात साकडं घालत आहेत का? असे विचित्र चित्र यानिमित्ताने पुढे आले आहे. निमित्त ठरले आहे ते धाड येथील दहीहंडीचे बॅनर्स, ज्यावर थेट काँग्रेस पक्षाचे स्थानिक नेते रिझवान सौदागर यांचा फोटो झळकत आहे! स्वतःचे कार्यकर्ते ‘गायब’ आणि विरोधकाचा फोटो ‘हायलाईट’, असा हा प्रकार पाहून ‘संजू भाऊ, हेच का ते कसदार नेतृत्व?’ असा उपरोधिक सवाल आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
शेकडो कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याचा दावा करणाऱ्या आणि स्वतःला ‘आग्या मोहळा’ची उपमा देणाऱ्या नेतृत्वावर आज दुसऱ्याच्या मदतीने कार्यक्रम करण्याची वेळ का आली?, हा सगळ्यात महत्त्वाचा व चर्चेचा मुद्दा ठरत आहे. राजकारणात नेतृत्व हे कसदार कर्तृत्वावर आणि स्थानिक जनतेशी असलेल्या थेट नाळेवर सिद्ध होत असते. दुसऱ्यांच्या मदतीने, बाहेरचे लोक आणून गर्दी गोळा करणे आणि शक्तिप्रदर्शन करणे म्हणजे ‘फटा पोस्टर, निकला भाईजान’ अशीच काहीशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
ये पब्लिक है, सब जानती है संजू भाऊ!
आपल्या भागातील लोक आणून दुसऱ्याच्या दारात वरात काढल्याने कधीही नेतृत्व सिद्ध होत नसते, तर ती स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीची आणि घसरलेल्या लोकप्रियतेची पावती असते. जनतेला आता हे राजकारण बरोबर समजत आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या पाठिंब्याने उसनी गर्दी जमवून ‘इव्हेंट’ करण्यापेक्षा आता खऱ्याअर्थाने आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे, हेच धाडच्या या राजकीय वादळावरून स्पष्ट होते.

