बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाचा ‘मृत्यूचा सापळा’! देऊळगाव घुबे-शेळगाव आटोळ मार्गावर सिमेंटचा ट्रक पलटी; कंत्राटदाराच्या मग्रुरीमुळे निष्पाप प्रवाशांचा जीव टांगणीला!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– चिखली तालुक्यातील रेंगाळलेल्या पुलाचे काम ठरतेय प्राणघातक; आणखी किती बळी घेणार?
– संरक्षक कठडे गायब, निकृष्ट दर्जाचे काम; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेशरम कारभाराविरोधात ग्रामस्थांचा उद्रेक!

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे): सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्लज्ज नाकर्तेपणा आणि मुजोर कंत्राटदाराचा ढिम्म कारभार यांमुळे चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ मार्ग आज ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. रेंगाळलेले रस्ता रुंदीकरण आणि अर्धवट लटकलेल्या पुलाच्या कामामुळे दररोज हजारो प्रवाशांना मरणाच्या दारात ढकलले जात आहे. या प्रशासकीय दुर्लक्षाचा थरारक नमुना नुकताच पाहायला मिळाला, जेव्हा सिमेंटची वाहतूक करणारा एक महाकाय ट्रक पुलावरून थेट खाली कोसळून पलटी झाला! सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी भ्रष्ट यंत्रणेमुळे सामान्यांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

धुळ्याहून भरधाव आलेला सिमेंटचा ट्रक (क्र. MH 18 BH 5499) देऊळगाव घुबे गावालगतच्या या अर्धवट पुलावर आला आणि क्षणार्धात खाली कोसळला. ट्रकमध्ये चालकासह तिघे जण मृत्यूच्या जबड्यात अडकले होते; स्थानिकांनी देवदूतासारखी धाव घेत त्यांना बाहेर काढले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची अवस्था बिकट असून, प्रशासन आता चौकशीचा देखावा करत आहे. परंतु, मूळ प्रश्न असा की, या अपघाताला जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये?


निकृष्ट दर्जाचा मुरूम अन् भ्रष्टाचाराची माती!

संरक्षक कठडे गायब, रिफ्लेक्टरचा पत्ता नाही!

या पुलाचे बांधकाम गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळले आहे. कंत्राटदाराची चरबी एवढी वाढली आहे की, पुलाच्या दोन्ही बाजूंना साधे संरक्षक कठडे (पॅरापेट वॉल) उभारण्याची तसदीही त्याने घेतलेली नाही. रस्त्यावर डांबरीकरणाचा पत्ता नाही, ‘रोड कोटिंग’ न केल्यामुळे रस्ता घसरगुंडी बनला आहे. ना रात्री चमकणारे रिफ्लेक्टर्स, ना धोका दर्शवणारे फलक, ना गतिरोधक! अंधारात हा पूल म्हणजे वाहनधारकांसाठी उघड्या डोळ्यांनी पाहिलेला नरक ठरत आहे.


रस्त्याच्या कामात मातीमिश्रित निकृष्ट मुरूम वापरून कोट्यवधींच्या निधीवर दरोडा टाकला जात असल्याचा थेट आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अन् अर्धवट पुलाचा अंदाज न आल्यास एखादी बस किंवा दुचाकी थेट दरीत कोसळून भीषण हत्याकांड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार नेमके कसले वाट पाहत आहेत? एखादा मोठा बळी गेल्यावरच या अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार का? या अपघाताची गंभीर दखल घेऊन पुलाचे काम २४ तासांत युद्धपातळीवर सुरू करावे, मजबूत कठडे उभारावेत आणि सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा संतप्त जनता कंत्राटदार आणि प्रशासनाला रस्त्यावर गाडल्याशिवाय राहणार नाही, असा आक्रमक इशारा देऊळगाव घुबे व शेळगाव आटोळ परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.

Share This Article
Exit mobile version