– अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील गावठी दारूविक्रीची पाळेमुळे खोदून काढणार!
चिखली (एकनाथ माळेकर) – देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत गावठी व अवैध दारूविक्रीचा प्रश्न गंभीर बनला असून, बायगाव खुर्द, अमोना, मेंडगाव, अंत्री खेडेकर, या गावांतील ग्रामस्थ व महिलांनी थेट पोलिस ठाणे गाठत ठाणेदार गणेश हिवरकर यांच्याकडे वैâफियत मांडली होती. परंतु, तरीदेखील दारू बंद झाली नव्हती. परंतु, वारंवार महिला व ग्रामस्थांची होणारी आंदोलने, प्रसारमाध्यमांतून ठाणेदार हिवरकर यांच्यासह अंढेरा पोलिसांची खराब होणारी प्रतिमा आणि निष्क्रियतेचा बसणारा ठप्पा, आणि या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते याप्रश्नी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना थेट करत असलेले फोन पाहाता, ठाणेदार हिवरकर यांनी अॅक्शन मोडवर येत, अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील गावठी दारू बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, काही ठिकाणी कारवाया सुरु झाल्या असून, खरोखर दारू बंद होते की, नाही याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
चिखली व देऊळगाव राजा या दोन तालुक्यांत अंढेरा पोलिस ठाणे हद्दीतील गावे येतात. या भागात मोठ्या प्रमाणात गावठी व अवैध दारूविक्री होत आहे. मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, मेरा, अंत्री खेडेकर, अमोना, मेंडगाव, बायगाव खुर्द यासह बहुसंख्य गावांत दारूचा महापूर उसळत असल्याने ग्रामीण महिला त्रस्त झालेल्या असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. कमी वयाच्या मुलांनाही दारूचे व्यसन लागले असून, गावोगावी हाणामार्या, भांडणे, महिलांवरील अत्याचार यांचे प्रमाण वाढलेले आहे. याबाबत ग्रामस्थ व महिला पोलिस ठाण्यात जातात. निवेदन वैगरे देतात पण पोलिस कारवाई करत नाहीत. दारूबंदी विभाग तर अजगरासारखा सुस्तावलेला आहे. पोलिस व दारूबंदीवाल्यांचे अर्थपूर्ण संबंध दारूविक्रेत्यांशी असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहेत. परंतु, या सर्व प्रकारामुळे पोलिस ठाणे हद्दीत चांगले काम करूनही ठाणेदार गणेश हिवरकर यांची प्रतिमा मलिन झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याकडे या गावांतील अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी फोन करून हिवरकर यांच्याबद्दल तक्रारीही केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची मलिन होणारी प्रतिमा पाहाता, ठाणेदार हिवरकर हे अखेर अॅक्शन मोडवर आले असून, त्यांनी गावठी दारूविक्रेत्यांचे पाळेमुळे खोदून काढण्यास सुुरवात केली आहे. सर्व बीट जमादार यांना त्यांनी दारू बंद करण्याचे आदेश दिले असून, गावठी दारूविक्रेत्यांविरोधात चॅप्टर केसेस वाढवलेल्या आहेत. त्यामुळे या कारवाईचा नजीकच्या काळात खरेच काही परिणाम पडला की नाही, हे दिसून येणार आहे.
पोलिस व दारूबंदी विभाग यांच्या दारूविक्रेत्यांसोबतच्या अर्थपूर्ण व्यवहारामुळे या भागात अवैध दारूचा महापूर वाहात आहे. त्यामुळे ठीकठिकाणाच्या महिलांनी पोलीस स्टेशनला अवैध दारू हद्दपार करण्यासाठी निवेदन दिले. त्यात बायगाव खु, त्यानंतर गुंजाळा येथील महिला कर्तव्यदक्ष पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन, त्यानंतर अमोना येथील महिला, त्यानंतर मेंडगावच्या कर्तव्यदक्ष महिला सरपंच कायंदे यांचे निवेदन, त्यानंतर अमोना येथील महिलांचे निवेदन. परंतु महिला येतात निवेदन देऊन जातात, वृत्तपत्र प्रतिनिधी वृत्त प्रकाशित करतात. परंतु यातून ना दारू बंदी विभाग अॅक्शन मोडवर आला ना पोलीस प्रशासन यांनी मरगळ झटकली. महिलांचे निवेदन व वृत्तपत्र यात प्रकाशित वृत्त बेदखल करून आधिकारी मोकळे होत असताना, अवैध दारू विक्रेते यांची वाढणारी मुजोरी हा बिहार राज्याप्रमाणे या भागात गंभीर प्रश्न बनलेला आहे. नुकतेच अंत्री खेडेकर येथील सरपंचपती सचिन खेडेकर, व कर्तव्यदक्ष पोलीस पाटील रामदास मोरे यांच्या उपस्थितीत शेकडो रणरागिणी यांनी अंढेरा पोलीस स्टेशन गाठून निवेदन दिले. येथूनच अवैध दारू हद्दपार करण्यासाठी लढा उभा राहिला व जनमाणस संतप्त होत गेले. ही गंभीर समस्या व पोलिसांची होणारी बदनामी पाहाता, अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर अॅक्शन मोडवर आले व त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गावातील अवैध दारू विक्रेते यांना दारू बंद करण्यासाठी योग्य नियोजन केले. परंतु, आता हे नियोजन औट घटकेचे ना राहता ठोस व धडाकेबाज कारवाई अपेक्षित आहे.
‘आपण कायमच अवैध दारूविरोधात अॅक्शन मोडवरच राहणार.
– गणेश हिवरकर, ठाणेदार, अंढेरा

